काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अनुराग ठाकूर (Anurag Thakur) जातीय जनगणनेच्या (Caste Census) मुद्द्यावरुन आपापसात भिडले. दोघांमध्ये जोरदार वाद झाल्यानंतर अखिलेश यादव यांनीही राहुल गांधींचं समर्थन करत सत्ताधारी नेत्यांना घेरलं. यावेळी संसदेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राहुल गांधी यांनी अनुराग ठाकूर यांनी शिवी दिल्याचा आरोप केला. तसंच आपल्याला त्यांच्याकडून माफीही नको असं म्हटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे, ज्यामध्ये अर्थसंकल्पावर चर्चा केली जात आहे. यादरम्यान जातीय जनगणनेचा मुद्द्हाही उचलण्यात आला. यावेळी राहुल गांधींनी आरोप केला की, अनुराग ठाकूरने मला शिवी दिली आहे, माझा अपमान केला आहे. पण मी त्यांच्याकडून माफीची अपेक्षा करत नाही असं म्हटलं. अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटलं होतं की, "त्यांना माहिती हवं की, LoP चा फुलफॉर्म लीडर ऑफ अपजोशिन असतं, लीडर ऑफ प्रोपगंडा नाही. काँग्रेस पक्षाने फार भ्रष्टाचार केला आहे".


अनुराग ठाकूर यांनी हे विधान करताच सभागृहात एकच गदारोळ सुरु झाला. यानंतर राहुल गांधी आपल्या जागेवर उभे राहिले आणि अनुराग ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधींनी महाभारताचा उल्लेख करत म्हटलं की, "स्पीकर सर, जो कोणी दलितांचा मुद्दा उचलतो त्याला शिव्या खाव्या लागतात. मी सर्व शिव्या प्रेमान खाईन. महाभारताचा उल्लेख झाला आहे तर, अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता. आम्हाला जातीय जनगणना हवी असून, आम्ही ती करुनच राहणार. यासाठी मला हव्या तितक्या शिव्या द्या". राहुल गांधी म्हणाले की, अनुराग ठाकूर यांनी मला शिवी दिली असून, मला मात्र त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही. 



राहुल गांधींच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यानंतर सभागृहात पुन्हा गदारोळ वाढला तेव्हा सभापती जगदंबिका पाल यांनी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं. यावेळी अखिलेश यादव आपल्या जागेवरून उभे राहिले आणि राहुल गांधींना पाठिंबा देत केंद्र आणि सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, 'सभागृहात कोणाची जात कशी काय विचारता येईल?'.  यावर सभापती पाल म्हणाले की, सभागृहात कोणी कोणाची जात विचारणार नाही.