राहुल-प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवले, पायीच हाथरसला रवाना
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत.
लखनऊ : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशात आणखी एक घटना घडली. बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आले. आरोपीनी पीडितेची कंबर आणि पाय तोडले. तक्रार नोंदवून न घेणाऱ्या पोलिसांनी रात्रीच अंत्यसंस्कार उरकले. या सर्व प्रकाराबाबत संताप आणि चीड व्यक्त होत आहे. दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. त्यांना एक्स्प्रेस हायवेवर अडविण्यात आले. त्यानंतर ते पायीच रवाना झालेत.
संतापाची लाट उसळली असताना उत्तर प्रदेशात त्याआधीच जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात आल्याने १४४ हे कलम लागू केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राहुल-प्रियंका गांधी यांना एक्स्प्रेस वेवर रोखले.
राहुल-प्रियंका गांधी पायीच हाथरसला रवाना झाले आहेत. तसेच केवळ राहुल आणि प्रियंका यांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. ते हाथरसला पीडित कुटुंबाची घेणार भेट आहेत. नोएडा फ्लायवेवर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून यावेळी घोषणाबाजी केली जात आहे.
प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सांगितले की, योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे. बलात्कार प्रकरणी एसआयटीने तपास सुरु केला आहे. एसआयटी टीम आज पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे.
१४ सप्टेंबर रोजी आपल्या भावा सोबत ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली, तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. तिचा पाठिचा कणाही मोडण्यात आला.