राहुल गांधींच्या सल्लागार टीम मधील संभाव्य चेहरे...
सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ती राहुल गांधी यांच्या संभाव्य सल्लागार टीमची. सल्लागार टीमसाठी अनेक नावांची चर्चा आहे. त्यापैकी काही नावांवर टाकलेला हा कटाक्ष....
मुंबई : कॉंग्रेस पक्षासाठी अखेर तो दिवस उजाडला. राहुल गांधी यांनी अधिकृतपणे कॉंग्रेस पक्षाची अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राहुल गांधींनी ही सूत्रे हाती घेतल्यामुळे त्याची अधीक चर्चा झाली नाही. पण, सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ती राहुल गांधी यांच्या संभाव्य सल्लागार टीमची. सल्लागार टीमसाठी अनेक नावांची चर्चा आहे. त्यापैकी काही नावांवर टाकलेला हा कटाक्ष....
अजय माकन : कॉंग्रेसच्या सत्ताकालात केंद्रीय मंत्री राहिलेले अजय माकन हे राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षित यांचे कट्टर टीकाकार असूनही ते दिल्ली कॉंग्रेसचे प्रमुख बनले. तेही राहुल गांधींमुळेच. 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर प्रसारमाध्यमांना सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. राहुल गांधींच्या टीममध्ये माकन सचीव म्हणून काम करू शकतात. सोनिया गांधी यांचे राजकीय सचीव म्हणून अहमद पटेल यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
कनिष्क सिंह : राजकीय सल्लागार सचिव पदानंतर सर्वात महत्त्वाचे ठरते ते कोषाध्यक्षपद. पक्षाच्या एकूण जमा-खर्च आणि निधीचा तपशील एकूणच आर्धिक बजेट सांभाळणारे हे महत्त्वाचे पद. कॉंग्रेसच्या इतिहासात सीताराम केसरी, मोतीलाल व्होरा, यांसारख्या मंडळींनी हे पद भूषवले आहे. या पदावर वर्ल्ड बॅंकेतील कामाचा अनुभव असलेल्या कनिष्क सिंह यांची वर्णी लागू शकते. कनिष्क सिंह यांनी यापूर्वी मोतीलाल व्होरा यांच्यासोबतही काम केले आहे.
दिव्या स्पंदना : कॉंग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचा कार्यभार सांभाळणारा प्रमुख चेहरा म्हणून दिव्या स्पंदना (राम्या) यांच्या नावाची चर्चा असते. राहुल गांधींची प्रतिमा बदलण्यात राम्याचा मोठा वाटा राहिलेला आहे. कॉंग्रेसच्या सोशल मीडियावर कमालीची पकड असलेली आणि कर्नाटकमधून संसदेवर आलेली राम्याला राहुल गांधींच्या टीममध्ये संधी मिळू शकते. तिच्याकडे कॉंग्रेसच्या सोशल मीडिया विभागाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
सुष्मिता देव आणि शर्मिष्ठा मुखर्जी : सुष्मिता देव या कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री संतोष मोहन देव यांच्या कन्या आहेत. तर, शर्मिष्ठा मुखर्जी या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या आहेत. दोघींनाही राहुल गांधी यांच्या टीममध्ये संधी मिळू शकते.
यूवा नेत्यांना संधी
दरम्यान, मिलिंद देवरा, सचिन पायलट, जितेन प्रसाद, ज्योतिराधित्य सिंधिया, राजिव सातव हे चार,पाच तरूण नेतेही राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळ राहिले आहेत. यांनाही राहुल गांधींचे सल्लागहार म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, कमल नाथ यांच्यावरही काही विशेष जबाबदारी सोपवली जाऊ शकते.