भोपाळ: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या पक्षातील वयाने मोठ्या असलेल्या नेत्यांनाही एकेरी नावाने हाक मारतात. त्यांचे हे वागणे भारतीय संस्कृतीला शोभते का, असा सवाल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उपस्थित केला. ते बुधवारी प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या वर्तनावर टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी मंगळवारी इंदूरमध्ये रोड शो साठी आले होते. यावेळी ते एका हॉटेलमध्ये जेवायला थांबले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी आइस्क्रीम मागवले. तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल नाथ राहुल यांच्या बाजुला बसले होते. कमल नाथ यांनी राजीव गांधी यांच्योसबतही काम केले होते. 


मात्र, वयाने इतक्या मोठ्या असलेल्या कमल नाथ यांना राहुल यांनी एकेरीत संबोधले. कमल आइस्क्रीम खूप चांगलं आहे, तू पण खा, असे त्यांनी सर्वांदेखत म्हटले. हे आपल्या संस्कृतीला शोभते का, असा सवाल शिवराज सिंह यांनी विचारला. 


यावेळी शिवराज सिंह यांनी काँग्रेसने त्यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोपही फेटाळून लावले. राहुल यांनी माझ्यावर आणि मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, पत्रकारांनी त्यांच्याकडे याबद्दलचे पुरावे मागितले. तेव्हा राहुल यांनी म्हटले की, मी तेव्हा गोंधळलो होतो. तुम्ही असेच गोंधळात राहिलात तर देश काय चालवणार, असा टोला यावेळी शिवराजसिंह यांनी लगावला.