सोनिया गांधी आजारी असताना `ते` पत्र आले; राहुल गांधी काँग्रेस नेत्यांवर नाराज
या बैठकीत राहुल गांधी यांचे आरोप ज्येष्ठ नेत्यांना चांगलेच झोंबल्याचे दिसून आले.
नवी दिल्ली: काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रासंदर्भात राहुल गांधी यांनी सोमवारी पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत उघडपणे नाराजी व्यक्त केली. हे पत्र पाठवण्याची वेळ चुकीची होती, असे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यावेळी सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नव्हती. तसेच त्यावेळी काँग्रेस मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपशी झुंजत होता. त्यामुळे सोनिया गांधींना पत्र पाठवण्याची ही वेळ अयोग्य असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्टपणे सांगितले.
मोठी बातमी: मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा- सोनिया गांधी
काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहलेले पत्र नुकतेच समोर आले होते. या पत्रात ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भविष्यात पक्षाला अधिकारांचे विकेंद्रीकरण आणि अधिक सक्रिय नेतृत्त्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या नेत्यांमध्ये पाच माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यकिरिणीचे अनेक सदस्य आणि काही माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
'उद्या राहुल गांधी यांनी निर्णय घेतला तर आम्ही महाविकासआघाडी सरकारमधून बाहेर पडू'
आज कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे सोनिया गांधी यांनी आपल्याला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी इच्छा व्यक्त केली. मात्र, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदावर कायम राहावे, असे निवेदन दिले आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार याविषयी सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, या बैठकीत राहुल गांधी यांचे आरोप ज्येष्ठ नेत्यांना चांगलेच झोंबल्याचे दिसून आले. या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपच्या सांगण्यावरून पत्र लिहले का? पत्र लीक करण्याचा उद्देशही प्रामाणिक नव्हता, असे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपच्या संपर्कात असल्याचे सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, अशी भूमिका घेतली. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीची ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.