नवी दिल्ली: मोदी सरकारवर आक्रमकपणे टीका करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे एक वेगळेच रुप शुक्रवारी पाहायला मिळाले. राहुल यांनी एका कार्यक्रमात चक्क संयुक्त पुरोगामी सरकारच्या (यूपीए) कारभारावर टीका केली. ते शुक्रवारी हिंदुस्तान लीडरशिप समिटमध्ये बोलत होते. यावेळी सोनिया गांधीही व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यांच्यादेखत राहुल यांनी काँग्रेसच्या विचारपद्धतीतील दोषांवर बोट ठेवले. 


काँग्रेस नव्या विचाराने वाटचाल करायला सज्ज आहे का, असे राहुल यांना विचारण्यात आले. त्यावेळी राहुल यांनी म्हटले की, काँग्रेसने पूर्वीच्याच रणनीतीने वाटचाल करावी, हे मला मान्य नव्हते. आम्ही पुन्हा निवडून येण्यासाठी विशेष असे काहीच केले नाही. केवळ एम्ससारखी अनेक रुग्णालये उभारून काहीही होत नाही. याउलट आपल्याला प्रगत तंत्रज्ञान असलेल्या संस्था उभारल्या पाहिजेत, असे सांगत त्यांनी यूपीए सरकारच्या धोरणांवर टीका केली.