`मोदींनी संरक्षण खात्यातला पैसा चोरून अनिल अंबानींना दिला`
राहुल गांधी यांनी मोदींनी संरक्षण खात्यातला पैसा चोरून अनिल अंबानींच्या तिजोरीत भरण्यासाठी वैयक्तिकरित्या मदत केल्याचा आरोप केला.
नवी दिल्ली : पंतप्रधानांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींनी संरक्षण खात्यातला पैसा चोरून उद्योगपती अनिल अंबानींच्या तिजोरीत भरण्यासाठी वैयक्तिकरित्या मदत केल्याचा आरोप केला. मोदींवर टीका करताना राहुल गांधी यांची जीभ घसरली. काँग्रेसच्या अल्पसंख्याक मोर्चा संमेलनात बोलताना त्यांनी पंतप्रधानांची डरपोक म्हणून संभावना केली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देश चालवू इच्छित असल्याचंही वक्तव्य त्यांनी केले आहे. मोदींनी आपल्यासोबत केवळ ५ मिनिटं खुला वादविवाद करून दाखवावा, असे आव्हानही राहुल गांधी यांनी दिले आहे.
दरम्यान, भाजपचे मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक राहुल गांधी यांनी केले होते. आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक केले आहे.
नितीन गडकरी यांनी देशातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी केलेल्या चांगल्या कामाचं सोनिया गांधी यांनी बाक वाजवून कौतुक केले. शून्य तासामध्ये सभागृहात नितीन गडकरींच्या मंत्रालयाशी संबंधित दोन प्रश्न घेण्यात आले. यावेळी देशभरात रस्त्यांचं जाळं उभारण्यासाठी गडकरींच्या मंत्रालयाकडून सुरु असलेल्या तसंच रखडलेल्या कामाची सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी गडकरी यांनी सर्वांचे आभार मानले. ते म्हणालेत, मी येथे सर्व खासदारांचे आभार मानतो. राजकीय मतभेद विसरुन सर्व मंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात माझ्या मंत्रालयाडून कऱण्यात आलेल्या कामांचं कौतुक केले आहे’, असे यावेळी गडकरी यांनी सांगितले.