नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सीमा प्रश्नावर बोलावण्यात आलेल्या बैठकीतून वॉकआऊट केलं. देशाच्या सीमा प्रश्नावर संसदीय संरक्षण समितीने बैठक बोलावली होती. या बैठकीत लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल (LAC) आणि डोकलामच्या (Doklam) मुदद्यावर काँग्रेसकडून चर्चेची मागणी करण्यात आली. पण समिती अध्यक्षांनी चर्चेस नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस सदस्यांनी बैठकीतून वॉकआऊट केलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'केंद्र सरकारच्या परराष्ट्र आणि संरक्षण नितीमुळे आपल्या देशाला कमकुवत केलं आहे', असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही विरोधी पक्षांनीही राहुल गांधी यांचं समर्थन केलं. 


बैठकीत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कामकाजाविषयी चर्चा होती. पण राहुल गांधी यांनी याला आक्षेप घेत, गेल्या काही बैठकांमध्ये याच मुद्दयावर चर्चा होत असल्याचं म्हटलं. भारत-चीन सीमेवर चीनच्या कारवाया आणि संरक्षण विषयक इतर मुद्यांवर चर्चा होण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली. मात्र, अजेंड्यात हा विषय नसल्याचं सांगत अध्यक्षांनी त्यांची विनंती फेटाळली असल्याचं बोललं जात आहे.


याआधीही राहुल गांधी यांनी संरक्षण समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळेसही अजेंड्या व्यतिरिक्त पूर्व लडाखमध्ये देशाची काय तयारी आहे?, चीनबाबत रणनिती काय आहे?, असे प्रश्न उपस्थित केले होते. भारत यापूर्वी कधीच इतका असुरक्षित नव्हता”, असं ट्वीट त्यांनी केलं होतं.