ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राहुल गांधी परदेशात
यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या प्रसंगी राहुल गांधी परदेशात जाऊन बसल्याचे प्रकार घडले आहेत.
नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांतील विधानसभा निवडणूक ऐन भरात असताना काँग्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे परदेशात जाऊन बसले आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसला या निवडणुकांविषयी गांभीर्य आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. ते १० ऑक्टोबरपर्यंत मायदेशी परततील. यानंतर ते महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणूक प्रचारात सहभागी होतील, असे सांगितले जात आहे.
राहुल गांधी हे विधासनभा निवडणुकीतील काँग्रेसच्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांनी यासाठी साधी बैठकही घेतलेली नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे पुरते पानिपत झाले असताना पक्षाला उभारी देण्यासाठी राहुल गांधी यांनी राज्याचा दौरा करणे अपेक्षित होते. मात्र, काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर राहुल गांधी भलतेच निवांत झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या प्रचाराची कोणतीही तमा न बाळगता ते परदेशात जाऊन बसले आहेत.
काँग्रेसने मला वाऱ्यावर सोडलं, भाजपात मानसन्मान मिळतो- हर्षवर्धन पाटील
यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या प्रसंगी राहुल गांधी परदेशात जाऊन बसल्याचे प्रकार घडले आहेत. २०१५ साली ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात गायब झालेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तब्बल ५६ दिवसांच्या अज्ञातवासानंतर परतले होते. त्यावेळी या सगळ्याची प्रचंड चर्चा झाली होती. अशाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लढाईच्या क्षणी कोणाकडे पाहायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
संजय निरुपम यांचे काँग्रेस सोडण्याचे संकेत