मुंबई : राफेल करार प्रकरणी काही वेळापूर्वीच कॉंग्रेसने तात्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची कथित ऑडीओ क्लिप समोर आणली होती. राफेलची महत्त्वाची फाईल पर्रिकरांच्या बेडरुममध्ये असल्याचे कॉंग्रेस प्रवक्त्यांनी त्यानंतर म्हटले. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभेतही राफेल प्रकरणावरून आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महत्त्वाचे प्रश्न विचारले. राफेलच्या मुद्द्यावर पंतप्रधान गप्प का ?,123 विमानांची मागणी 36 विमानांवर का आली ?, राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिलं का ? असे प्रश्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित केले आहेत. मला याबद्दल काही माहिती नव्हती असं तात्कालीन संरक्षण मंत्री  पर्रिकर स्वत: म्हणाल्याचेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.


सेनेकडूनही कोंडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाबाजून काँग्रेस तर दुसरीकडे भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनेही भाजपची कोंडी करण्याची संधी सोडली नाही. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि अध्यक्ष राहुल गांधी यांना घेरण्याची पूर्ण तयारी भाजपने केली आहे. 2019 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घडामोडी जुळवून आणल्या जात आहेत. असे सर्व सुरू असले तरीही राफेल घोटाळ्याकडे लोकांचे दुर्लक्ष होणार नाही असा टोला भाजप सरकारला शिवसेनेचे मुखपत्र सामनातून लगावण्यात आला आहे.  संरक्षण विभागातील दलाल, मंत्री या सर्वांची एकत्र चौकशी व्हायला हवी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.


आरोपांचे खंडन 


काँग्रेसने राफेलप्रश्नी मनोहर पर्रिकर यांच्यावर केलेल्या आरोपाचे गोव्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी खंडन केले आहे. काँग्रेसने उल्लेख केलेली संभाषण टेप हा खोडसाळपणाचा प्रकार आहे. पर्रिकर यांचा कधीही याप्रकरणात संबध नव्हता असाही खुलासा विश्वजीत राणे यांनी केला आहे. काँग्रेसने केलेल्या या आरोपावरुन गोव्यात भाजपने आक्रमक भूमिका होत चौकशीची मागणी केली आहे. तर काँग्रेस खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याची प्रतिक्रीया यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांनी म्हटले.