नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे विमानांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे दलाल म्हणून काम करत असल्याची टीका केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केली. ते मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. एवढेच नव्हे तर 'चौकीदार चोर है' अशी घोषणा देत राहुल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले होते. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, राहुल गांधी विमानांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी दलाल म्हणून काम करतात. अन्यथा त्यांना एअरबस या कंपनीचा ईमेल कसा मिळाला? यूपीए सरकारच्या काळातील एअरबसचे अनेक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचा आरोपही यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी केला. 



तत्पूर्वी राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राफेलच्या मुद्द्यावरून सरकारवर आरोपांच्या नव्या फैरी झाडल्या. फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करण्याच्या १५ दिवस आधी उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान फ्रान्सला येतील आणि दोन्ही देशांमध्ये एक सामंजस्य करार होईल, असे तेथील अधिकाऱ्यांना सांगितले होते. हा करार म्हणजेच राफेल करार असल्याचे सांगून राहुल गांधी यांनी देशाच्या संरक्षण मंत्र्यांना, परराष्ट्र सचिवांना ज्याची माहिती नव्हती, ती अनिल अंबानी यांच्यापर्यंत पोहोचल्याचा आरोप राहुल यांनी केला.