नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राजकीय फायद्यापोटी हिंदू धर्माविषयी प्रेमाचे भरते आले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केली. ते शनिवारी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, राहुल गांधी यांची समस्या ही आहे की, ते प्रचंड गोंधळलेले आहेत. त्यामुळेच ते राजकीय फायद्यासाठी सतत हिंदू धर्माविषयीचा भूमिका बदलत असतात. ते निष्ठावंत हिंदू नाहीत. त्यांच्या हिंदू धर्माविषयीच्या प्रेरणा या राजकीय भावनेने प्रेरित असल्याची टीका रवीशंकर प्रसाद यांनी केली. राहुल गांधी यांनी उदयपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू असले तरी त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीच माहीत नाही. 'हिंदुत्वाचे सार काय आहे? गीता काय सांगते? ज्ञान सर्वांकडे आहे. ज्ञान आपल्या चहूबाजूला आहे, परंतु पंतप्रधान म्हणतात ते हिंदू आहेत. पण हिंदुत्वाचा मूळ पायाच त्यांना माहीत नाही. ते कुठल्या प्रकारचे हिंदू आहेत?, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. 




या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या बचावासाठी पुढे सरसावले आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज राहुल यांच्या टीकेचा प्रतिवाद करताना म्हटले की, राहुल गांधी यांचा धर्म आणि जात कोणती ? याबद्दल ते स्वत: आणि काँग्रेस पक्ष गोंधळलेला आहे. त्यामुळे पंतप्रधानांना हिंदू असण्याचा अर्थ कळत नाही असे ते म्हणाले. अनेक वर्षे काँग्रेसने राहुल गांधी यांना धर्मनिरपेक्ष नेता म्हणून सादर केले. परंतु निवडणुका जवळ आल्यानंतर हिंदू बहुसंख्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांच्याकडून राहुल गांधी यांची प्रतिमा बदलायचे प्रयत्न सुरु झाले, अशी टीका सुषमा स्वराज यांनी केली.