नवी दिल्ली : राहुल गांधी १६ डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरपासून बहुतांश काळामध्ये भारतात काँग्रेसचं सरकार होतं. मात्र, आता काही ठराविक राज्य सोडली तर सर्वत्र भाजप किंवा इतर पक्षांची सत्ता आहे. तसेच केंद्रातही भाजपचं सरकार आहे. त्यामुळे ४७ वर्षीय राहुल गांधी यांच्यासमोर अनेक आव्हान असणार आहेत.  


११ डिसेंबर रोजी होणार औपचारिक घोषणा


काँग्रेस अध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ११ डिसेंबर आहे. या पदासाठी एकमेव राहुल गांधी यांनी अर्ज दाखल केला आहे. राहुल गांधींच्या बाजुने ८९ अर्ज दाखल केले आहेत. तपासणीत हे सर्व अर्ज वैध ठरले. त्यामुळे ११ डिसेंबर रोजी राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यासंदर्भात औपचारिक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.



१६ डिसेंबर रोजी सोनिया गांधी सोडणार खुर्ची


राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाध्यक्ष नियुक्त केल्याचं प्रमाणपत्र १६ डिसेंबर रोजी दिलं जाईल. हे प्रमाणपत्र सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिलं जाईल. त्यानंतर सोनिया गांधी अधिकृतपणे १६ डिसेंबर रोजी जवळपास ११ वाजण्याच्या सुमारास काँग्रेस पक्षाची सूत्र राहुल गांधीकडे सोपवतील.


भेट आणि चर्चा


अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात देशभरातील नेत्यांची भेट घेतील. तसेच, पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करतील.