नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून आपल्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला आहे. यामध्ये राहुल यांनी म्हटले आहे की, पुढील २४ तास खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही सावध आणि सतर्क राहा. कोणालाही घाबरून नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. बनावट एक्झिट पोलच्या अपप्रचारामुळे निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा. तुमची मेहनत वाया जाणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सात टप्प्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होईल. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. यंदा ईव्हीएम यंत्रांबरोबर व्हीव्हीपॅटमधील स्लीपचीही पडताळणी होणार असल्याने निकाल जाहीर होण्यास वेळ लागू शकतो. 



तत्पूर्वी रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार देशात पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) बहुमताने सत्तेत येईल. मात्र, काँग्रेस विरोधकांनी एक्झिट पोलचा अंदाज फेटाळून लावला आहे. येत्या २३ मे रोजीच खरी परिस्थिती समोर येईल, असे विरोधकांनी म्हटले होते. 


काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मंगळवारी आश्वस्त केले होते. कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रुमबाहेर कडा पहारा द्यावा. एक्झिट पोल आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण निवडणुकीसाठी घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. काँग्रेस पक्ष नक्कीच चांगली कामगिरी करेल, असे प्रियंका यांनी म्हटले होते.