राहुल गांधी जम्मू - काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार
काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी हे उद्या जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी हे उद्या जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासह राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सीबीआयचे सरचिटणीस डी राजा, सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येच्युरी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा असणार आहेत. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर राहुल गांधी प्रथमच जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात काश्मीर खोऱ्यात हिंसाचार सुरू असल्याचे एका अहवालाचा हवाला देत म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत असल्याची टीकाही केली होती. राहुल गांधी यांच्या विधानावर जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक मात्र भडकले. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन सत्यपाल मलिक यांच्यावर टीका केली. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आव्हान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्विकारले होते. मलिक यांच्या वक्तव्याला राहुल गांधी यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. राहुल म्हणालेत, खरी स्वातंत्र्याची गरज आहे, विमानाची नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू असल्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक चांगलेच भडकले होते. राहुल गांधी यांच्यासाठी विमान पाठवतो. त्यांनी काश्मीरच्या खोऱ्यात यावे आणि इथली परिस्थिती पाहून मगच बोलावे, असे आव्हान सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांना दिले होते. मलिक यांचे आव्हान राहुल यांनी स्विकारत याबाबत ट्विट केले आहे. आम्हाला विमानाची गरज नाही. परंतु कृपया आम्हाला तेथील लोकांना, मुख्य प्रवाहातील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य देण्याची खात्री द्या.