नवी दिल्ली : संसदेचं अधिवेशन नवी दिल्लीत सुरू झाले असताना राहुल गांधी कुठे आहेत? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. लोकसभेच्‍या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधीच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी अनुपस्थित दिसले. त्यामुळे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबतचा तपशील घेतला असता असे लक्षात आले की, राहुल गांधी परदेशी सुट्ट्या उपभोगत आहेत. त्यामुळे लोकसभेचे अधिवेशन सुरू होऊन सुद्धा ते हजर राहिलेले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस अध्यक्षपदाचा वाद अद्यापही न मिटल्याने निर्माण झालेल्या तणावापासून दूर राहण्यासाठी राहुल गांधी यांनी परदेशी जाणं पसंत केले आहे. मात्र, लोकसभेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतरही वायनाडचा हे खासदार अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या राजकारण गांभीर्याने करण्याच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्रातील पहिलं लोकसभा अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. १७ व्या लोकसभेत अनेक नवे चेहरे दिसणार असून, केंद्रीय अर्थसंकल्प, तीन तलाक विधेयक असे महत्त्वाचे विषय पटलावर मांडले जाणार आहेत. या संसदीय अधिवेशनात १० विधेयके मांडली जाण्याची शक्यता असून, ५ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. 


अधिवेशनाचे पहिले दोन दिवस नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाणार आहे. १९ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतील. २६ जुलै रोजी लोकसभा अधिवेशनाची सांगता होणार आहे.