Rahul Gandhi On Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसताना दिसून येत आहे. तर काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. बहुमताकडे वाटचाल करत असल्याने  कर्नाटकचा कौल कुणाला? हे आता स्पष्ट होत आहे. भाजप सत्तेतून पायउतार होण्याचे संकेत आहेत. तर काँग्रेस सत्तेत बसणार असे सध्यातरी दिसून येत आहे. सत्तेची मॅजिक फिगर कोण गाठणार? याची उत्सुकता होती. मात्र,काँग्रेसने ही फिगर गाठल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचा विजय दिसत असल्याचे लक्षात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. मी अजिंक्य आहे, मला खूप विश्वास आहे. होय, आज मला कोणी थांबू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. याचा व्हिडिओ शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला असताना काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे.  कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांनी कर्नाटक अक्षरश: पिंजून काढला होता.  कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे गेल्याचे दिसून येत आहे.


भाजप 81 तर काँग्रेस 221 आणि जेडीएस 18 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे. विद्यमान भाजप सरकार पायउतार होत असल्याने हा भाजपला मोठा धक्का मानला जात असून मोदी-शाह यांनाही जोरदार शह बसल्याची चर्चा आहे. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने येथे जोर लावला होता. मात्र, भाजपला अपयश मिळताना दिसून येत आहे. 



दरम्यान, कर्नाटकात ‘40 टक्के भ्रष्टाचारा’त गुंतलेल्या भाजपला केवळ 40 जागा मिळतील. याची खात्री भाजपने करुन घ्यावी. तर काँग्रेसला किमान 150 जागा मिळतील. ते (भाजप) आमदार विकत घेणार नाहीत आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार पाडणार नाहीत, अशी आपण आशा करुया, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारा दरम्यान मारला होता. आता काँग्रेसने कर्नाटकात आघाडी घेतल्याने काँग्रेसचे सरकार येणार हेआता स्पष्ट होत आहे.