नवी दिल्ली: कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारच्या या कृतीचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, आर्थिक पॅकेजची घोषणा हे केंद्र सरकारने योग्य दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे. आपला देश शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजूर, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे देणे लागतो. या सर्वांना कोरोना लॉकडाऊनची मोठी झळ बसणार आहे. त्यामुळे या घटकांना मदत करणे, हे आपले कर्तव्य असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी सोनिया गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून देशातील गरिबांना मदत करण्याची मागणी केली होती. २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारने जनधन खातेधारक, पंतप्रधान किसान योजना आणि मनरेगा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तातडीने ७५०० रुपये जमा करावेत. तसेच देशातील रेशन कार्डधारक कुटुंबांना १० किलो तांदूळ किंवा गहू मोफत द्यावे, अशी मागणी सोनियांनी केली आहे.


वाचा : Corona : नागरिकांसाठी १.७० हजार कोटींची तरतूद; अर्थमंत्र्यांनी केल्या 'या' मोठ्या घोषणा




दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकापरिषद घेऊन आर्थिक पॅकेज जाहीर केले. यामध्ये शेतकरी, बांधकाम मजूर, रोजंदारीवर काम करणारे मजूर, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी अशा सर्वांसाठी केंद्र सरकारने उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार सरकारने स्वच्छता कर्मचारी आणि आरोग्य सेवकांना ५० लाखांचा विमा घोषित केला आहे. तर पंतप्रधान किसान योजनेसाठी सरकारने १५ हजार कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रूपये जमा केले जाणार आहेत.