शौचालयातून प्रवास, पाय ठेवायलाही जागा नाही; एसी बोगीचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय रेल्वेचा एक व्हिडीओ शेअर करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामान्य माणसांना रेल्वेच्या शौचालयातून प्रवास करावा लागतोय असा आरोप राहुल गांधींनी केलाय.
Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातलं राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. मात्र या सगळ्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आहे. सत्ताधारी भाजप काँग्रेसला गेल्या 70 वर्षांच्या सत्तेत काय केलं असा सवाल विचारत आहे. दुसरीकडे मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोगा काँग्रेस मागत आहे. अशातच राहुल गांधी यांनी एक धक्कादायक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करुन सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय रेल्वेचा एक व्हिडीओ शेअर करुन पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन नवी दिल्ली ते तिरुअनंतपुरम धावणाऱ्या केरळ एक्सप्रेस ट्रेनचा व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये प्रवासी ट्रेनच्या एसी कोचमध्ये टॉयलेटजवळ बसलेले दिसत आहेत. कोचच्या आतही बरीच गर्दी दिसत आहे. प्रवासी अगदी दाटीवाटीने बसलेले असून अन्य प्रवाशांना तर ट्रेनमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती आहे.
मोदी सरकारला हटवावे लागेल - राहुल गांधी
"नरेंद्र मोदींच्या राजवटीत 'रेल्वे प्रवास' ही शिक्षा झाली आहे. सर्वसामान्यांच्या गाड्यांमधून जनरल डबे कमी करून केवळ 'एलिट ट्रेन्स'चा प्रचार करणाऱ्या मोदी सरकारकडून प्रत्येक वर्गातील प्रवाशांना त्रास दिला जात आहे. कन्फर्म तिकीट घेऊनही लोकांना त्यांच्या जागेवर शांतपणे प्रवास करता येत नाहीये. मोदी सरकारला आपल्या धोरणांनी रेल्वे कमकुवत करून स्वतःला 'अक्षम' सिद्ध करायचे आहे, जेणेकरून ती आपल्या मित्रांना विकण्याचे निमित्त त्यांना मिळू शकेल. सर्वसामान्यांचा प्रवास वाचवायचा असेल, तर रेल्वेची नासाडी करण्यात मग्न असलेल्या मोदी सरकारला हटवावे लागेल," असे राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राहुल गांधींनी शेअर केलेला हा व्हिडिओ केरळ एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका मुलाने शूट केला आहे. व्हिडिओच्या शेवटी, हा मुलगा मल्याळममध्ये दिल्लीहून तिरुअनंतपुरम एक्स्प्रेसला जाणाऱ्या केरळ एक्स्प्रेसची अशी बकाल अवस्था झाल्याचे सांगताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ट्रेनच्या डब्यात प्रचंड गर्दी असून काही प्रवासी टॉयलेटमध्ये बसून प्रवास करत असल्याचे तो सांगत आहेत. प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना रेल्वेत खाली किंवा एकमेकांवर बसून प्रवास करावा लागत आहे. एसी कोचचे तिकीट काढणाऱ्यांनाही त्यांच्या हक्काच्या सीटवर नीट बसता येत नाहीये, असंही तो मुलगा सांगतोय.
राहुल गांधी वायनाडमधूनही पळ काढणार - पंतप्रधान मोदी
शनिवारी नांदेडमध्ये झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. "काँग्रेसच्या शहजाद्याला वायनाडमध्ये पराभव दिसतो आहे. शहजाद्याला पुन्हा दुसऱ्या ठिकाणी निवडणूक लढावी लागणार आहे. आधी अमेठी वरून पळावे लागले आणि आता वायनाड पण सोडावं लागणार. काँग्रेसचा परिवार स्वतः काँग्रेसला मतदान करणार नाही. 4 जूनच्या नंतर एक दुसऱ्यांचे कपडे फाडणार आहेत," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.