केरळ: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी आणखी एक चाणाक्ष खेळी केली. काँग्रेसची सत्ता आल्यास आमचे सरकार संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेईल, अशी घोषणा त्यांनी केली. कोचीन येथील जाहीर सभेत त्यांनी हे आश्वासन दिले. तसेच भविष्यातील प्रत्येक निवडणुकीत तरुण आणि महिलांचा सहभाग वाढवण्यावर आम्ही भर देऊ. आम्हाला महिलांना देशाचे नेतृत्त्व करताना पाहायचे आहे, असेही राहुल यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या कारभारावरही टीका केली. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दररोज खोटी आश्वासने देऊन देशाची पाच वर्ष फुकट घालवली. त्यांनी प्रत्येक वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांनी आपल्या १५ मित्रांचे उत्पन्न जास्तीत जास्त कसे वाढेल, हेच बघितले. तुम्ही अंबानी असाल तर तुमचे उत्पन्न जास्तीतजास्त वाढण्याची हमी आहे. मात्र, आम्ही देशातील प्रत्येक गरिबाला किमान उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले. 


राहुल गांधींनी घेतली मनोहर पर्रिकरांची भेट

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने नवे आणि चाणाक्ष राजकीय डावपेच खेळताना दिसत आहेत. गेल्याच आठवड्यात काँग्रेसने प्रियंका गांधी यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशातील प्रचाराची जबाबदारी सोपविली होती. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला होता. तसेच प्रियंका यांचा वैयक्तिक करिश्मा उत्तर प्रदेशात काँग्रेससाठी फायदेशीर ठरू शकतो, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. याशिवाय, सोमवारी छत्तीसगढमध्ये झालेल्या सभेत राहुल यांनी काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील गरिबांना किमान उत्पन्न देण्याची घोषणा केली होती.