Rahul Gandhi on Varun Gandhi: वरुण गांधींच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर राहुल गांधी म्हणाले, `मी त्यांना भेटू शकतो, मिठी मारु शकतो पण...`
rahul gandhi said on varun gandhi: राहुल गांधींना आज पत्रकारांनी वरुण गांधींसंदर्भातील प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी आरएसएसचा उल्लेख करत उत्तर दिलं
Rahul Gandhi on Varun Gandhi: केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करणारे भारतीय जनता पार्टीचे खासदार वरुण गांधींबद्दल (Varun Gandhi) काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सूचक विधान केलं आहे. वरुण गांधी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याची तसेच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच यासंदर्भात राहुल गांधींना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला. काँग्रेस पक्ष वरुण गांधींना स्वीकारु शकत नाही असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी वरुण गांधींची विचारसरणी वेगळी आहे. मी त्यांना भेटू शकतो, मिठी मारु शकतो मात्र त्यांना स्वीकार करु शकत नाही, असं राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपली आणि वरुण गांधींची विचारसणी वेगळी असल्याचं नमूद केलं. राहुल गांधींनी या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणजेच आरएसएसचाही उल्लेख केला. वरुण गांधींनी एकेकाळी आरएसएसची विचारसरणी स्वीकारली होती. ही विचारसणी मी कधीच स्वीकारु शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले. मी कधीच संघाच्या शाखेत जाणार नाही. मी असं करावंसं वाटत असेल तर तुम्हाला आधी माझा शिरच्छेद करावा लागेल. आमच्या कुटुंबाची एक विचारसणी असून त्यानुसारच आम्ही काम करतो, असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं.
राहुल गांधींनी यावेळी संघ आणि काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद असून आमचा वाद सुरु असल्याचा मुद्दा अधिक जोर देऊन सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी राहुल गांधींनी एका घटनेचा आवर्जून उल्लेख केला. वरुण गांधींनी एका भाषणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि त्या पक्षाची वैचारिक संघटना असलेल्या आरएसएसच्या माध्यमातून केल्या जाण्याऱ्या कामांची स्तृती केली होती असं राहुल गांधींनी म्हटलं.