`मुस्लिम लीग`ला धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणणाऱ्या राहुल गांधींना भाजपाचा टोला; म्हणाले, `जिन्नांची मुस्लिम...`
Rahul Gandhi On Muslim League: राहुल गांधींनी अमेरिकेतील वॉशिंग्टन डिसी येथे पत्रकारांशी संवाद साधताना केरळमधील या पक्षाबरोबरच्या युतीसंदर्भातील स्पष्टीकरण देताना मुस्लिम लीगबद्दल विधान केलं. राहुल गांधींच्या या विधानावरुन भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Rahul Gandhi On Muslim League: काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावू राहुल गांधी सध्या देशात सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. राहुल गांधींनी मुस्लिम लीगबद्दल (Muslim League) केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. मुस्लिम लीग हा धर्मनिरपेक्ष (secular) पक्ष असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. मात्र याच विधानावरुन आता भारतीय जनता पार्टीने राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. वायनाडमधील लोकांनी स्वीकारावं यासाठी राहुल गांधींची ही धडपड सुरु असल्याचा टोला भाजपाने लगावला आहे. मुस्लिम लीग हा पक्ष देशाचं विभाजन होण्यास जबाबदार होता. हाच पक्ष आता राहुल गांधींना धर्मनिरपेक्ष वाटतोय, असा उपरोधिक टोला भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी लगावला आहे.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधी आज वॉशिंग्टन डीसीमधील नॅशनल प्रेस क्लबमध्ये पोहोचले होते. यावेळेस त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधींना केरळमध्ये इंडियन युनियन मुस्लिम लीगबरोबर (IUML) युती केल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. आययूएमएलसोबत काँग्रेसने युती केली आहे याचा आधार घेत धर्मनरपेक्षतेच्या दृष्टीकोनात प्रश्न विचारला गेला. त्यावर राहुल गांधींनी लगेच, "मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यात धर्मनिरपेक्षतेविरोधात असं काहीही नाहीय," असं उत्तर दिलं. केरळमधील काँग्रेसच्या युतीमध्ये आययूएमएल हा महत्त्वाचा पक्ष आहे.
भाजपाने लगावला टोला
राहुल गांधींनी केलेल्या या विधानावरुन भाजपाच्या अमित मालवीय यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे. "जिन्नांची मुस्लिम लीग पार्टी तीच आहे जिच्यामुळे धर्माच्या आधारावर भारताचं विभाजन झालं. राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार हा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे. वायनाडमध्ये आपल्याला स्वीकारलं जावं यासाठी राहुल गांधी नाइलाजाने हे विधान करत आहेत," असा टोला मालवीय यांनी ट्वीटरवरुन लगावला आहे. राहुल गांधींनी 2019 मध्ये अमेठी आणि केरळमधील वायनाडमधून लोकसभेची निवडणूक लढली होती. अमेठीमध्ये राहुल यांना भाजपाच्या स्मृती इराणींनी पराभूत केलं होतं. तर वायनाडमध्ये विजय मिळवून राहुल गांधी खासदार झाले होते. मात्र याच वर्षी मार्च महिन्यामध्ये सूरतमधील कोर्टात मानहानीच्या खटल्यामध्ये राहुल यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती.
काँग्रेस चांगली कामगिरी करेल
पुढे बोलताना राहुल गांधींनी आगामी 2 वर्षांच्या कालावधीमध्ये काँग्रेस भारतामध्ये चांगली कामगिरी करेल असा विश्वास राहुल गांधींनी आपल्या भाषणादरम्यान व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांविरोधात एक छुपी लाट तयार होत असल्याचंही राहुल गांधी म्हणाले.