राहुल गांधी यांचे केंद्र सरकारला थेट आव्हान, `आम्ही घाबरणार नाही, तुम्हाला जे काही...`
ED Notice: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
नवी दिल्ली : ED Notice: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'तुम्ही नॅशनल हेराल्डबद्दल बोलत आहात, हा धमकावण्याचा प्रयत्न आहे. त्यांना वाटतं की थोडं दडपण आणून ते आपल्याला गप्प करतील. आम्ही घाबरणार नाही. आम्ही नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही. त्यांना हवे ते करु शकतात, असा इशारा राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला.
राहुल यांचा मोदी सरकारवर निशाणा
संसदेत आजही बराच गदारोळ झाला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याच्या आरोपावरुन काँग्रेस पक्षाने आजही प्रचंड गदारोळ केला. त्याचवेळी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना समन्स बजावलेल्या ईडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांनी आज संसदेत म्हटले आहे की, संसदेचे अधिवेशन सुरु असताना मला संसदेच्या अधिवेशनाच्या मध्यावर ईडीची नोटीस मिळाली आहे. यानंतर राहुल गांधी यांचे वक्तव्य आले आहे की, आम्ही घाबरणार नाही तर जोरदारपणे लढू.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, संसद सुरु असताना मला ईडीकडून समन्स येतात. तुम्ही लगेच या. मला 12:30 वाजता निघायचे आहे. मला कायदा पाळायचा आहे, पण संसद सुरु असताना मला बोलावणे योग्य आहे का? काल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घराला पोलिसांनी घेराव केला होता. अशी लोकशाही टिकेल का? संविधानाच्या अंतर्गत काम करु शकू का? आम्ही घाबरणार नाही, लढू. आम्ही तुम्हाला या विषयावर चर्चा करण्याचे आवाहन करतो, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या चौकशीला सामोरे जात असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले की, आपण मोदी सरकारला घाबरत नाही. आपल्या घराबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल म्हणाले की, आम्ही पळून जाणार नाही आणि नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही. त्यांना पाहिजे ते करू द्या. आपल्यावर दबाव आणून ते आपला आवाज बंद करु शकतात, असे त्यांना वाटते. पण तसे होणार नाही. मोदी आणि अमित शाह जे काही करत आहेत ते लोकशाहीच्या विरोधात आहे.
गुरुवारी संसदेत काँग्रेस खासदारांच्या बैठकीला राहुल गांधी उपस्थित राहिले नाहीत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) येथील हेराल्ड हाऊस सील केल्यानंतर काँग्रेसने बैठक बोलावली होती. सत्ताधारी सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांना ‘दहशतवाद्यां’सारखी वागणूक देत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला.