भोपाळ: बालाकोट एअर स्ट्राईकच्यावेळी आकाशात असलेल्या ढगांमुळे भारतीय वायूदलाची विमाने पाकिस्तानला रडारवर दिसली नाहीत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य सध्या चांगलेच गाजत आहे. अनेकांनी मोदींचा हा दावा हास्यास्पद असल्याचे सांगत त्याची खिल्ली उडविली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मंगळवारी मध्य प्रदेशच्या नीमूच येथील सभेत मोदींना टोला हाणला. मोदीजी तुमचे वक्तव्य प्रमाण मानायचे झाले तर पावसाळ्यात भारतामधील सगळी विमाने रडारवरून गायब होतील का, असा खोचक सवाल राहुल यांनी विचारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या नरेंद्र मोदींच्या अनौपचारिक मुलाखतीवरही राहुल यांनी भाष्य केले. या मुलाखतीत मोदींनी आम्हाला आंबा कसा खायचा, हे सांगितले. आता त्यांनी देशातील बेरोजगार युवकांसाठी काय करणार, हेदेखील सांगावे, असा चिमटाही राहुल यांनी काढला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी न्यूज नेशन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे वक्तव्य केले होते. यावेळी मोदींनी बालाकोट एअर स्ट्राईकचा एक किस्सा सांगितला. बालाकोट एअर स्ट्राईकच्यावेळी वातावरण खराब होते. त्यामुळे त्या रात्री हल्लाची योजना रद्द करण्याचा विचार वायूदलाचे अधिकारी करत होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे भारतीय विमानांना पाकिस्तानी रडारपासून लपता येईल, असे मी अधिकाऱ्यांना सुचवल्याचे मोदींनी म्हटले. 



सुरुवातीला भाजपच्या ट्विटर हँडलवरून मोदींचे हे वक्तव्य ट्विट करण्यात आले होते. मात्र, या वक्तव्यावर टीका होऊ लागल्यानंतर भाजपवर हे ट्विट डिलिट करण्याची नामुष्की ओढावली होती.