नवी दिल्ली: 'चौकीदार चोर है' ही वाक्ये सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घातल्याप्रकरणी अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिनशर्त माफी मागितली. राहुल गांधी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये आपण न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी बिनशर्त माफी मागत असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाविषयी आपल्या मनात सर्वोच्च प्रतिष्ठा आणि आदर असल्याचेही राहुल यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात म्हटले आहे. तसेच याप्रकरणी भाजप नेत्या मिनाक्षी लेखी यांनी आपल्याविरुद्ध दाखल केलेला खटलाही रद्द करण्यात यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी राफेल करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी 'चौकीदार चोर है' अशी टिप्पणी केली होती. मात्र, न्यायालयाच्या निकालातून असा कोणताही अर्थ प्रतित होत नसल्याचे सांगत भाजप नेत्या मिनाक्षी लेखी यांनी राहुल यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली होती.



 यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात राहुल यांनी आपल्याला केवळ पश्चाताप झाल्याचे म्हटले होते. या स्पष्टीकरणावर असमाधानी असलेल्या न्यायालयाने राहुल यांना पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.