नवी दिल्ली: राफेल विमानांची किंमत आणि सुरक्षा यंत्रणांची माहिती जगजाहीर करून राहुल गांधींना पाकिस्तानची मदत करायची आहे, असा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. ते शनिवारी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे खंडन केले. 
 
यूपीएच्या काळात ही विमाने कमी किंमतीमध्ये खरेदी करण्याचा करार झाला होता, असा दावा  काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र, त्या करारामध्ये अत्याधुनिक संरक्षण प्रणालीचा समावेश नव्हता. या संरक्षण प्रणालीविना राफेल विमाने निरुपयोगी ठरली असती. आता राहुल गांधी विमानांची किंमत आणि संरक्षण प्रणालीची माहिती जाहीर करायला सांगत आहेत. मात्र, आम्ही त्यांच्याप्रमाणे बेजबाबदार नसल्यामुळे विमानाच्या तपशीलांविषयी गुप्तता बाळगली आहे. असे केल्यास पाकिस्तान आणि चीनला या विमानांच्या ताकदीचा अंदाज येईल, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच ही विमाने तयार करणाऱ्या दसॉल्ट या मुख्य कंपनीने ऑफसेट भागीदाराची निवड स्वत:च केली आहे. केवळ रिलायन्सच नव्हे तर आणखी बऱ्याच कंपन्यांशी दसॉल्टची बोलणी सुरु आहेत. यामुळे भारतात मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतात. मात्र, राहुल गांधींनी या सगळ्याचा अभ्यासच न केल्याने ते बेछूट आरोप करत सुटले आहेत. अशावेळी पक्षातील कोणताही नेता त्यांना काही सांगतही नाही, कारण ते त्यांना घाबरतात. 


राहुल गांधींनी देशाच्या सुरक्षेशी सुरु असलेला हा खेळ थांबवला पाहिजे. कसलीही माहिती नसलेल्या एका नेत्याचा अहंकार संतुष्ट करण्यासाठी सरकार या व्यवहाराच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती किंवा कॅग समिती स्थापन करणार नाही, असेही रविशंकर प्रसाद यांनी ठणकावून सांगितले.