नवी दिल्ली: संसदेच्या संयुक्त सत्रात गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण पार पडले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मोबाईल बघण्यात व्यग्र असल्याने वाद निर्माण झाला होता. भाजप नेते गिरीराज सिंह आणि बाबुल सुप्रियो यांनी या गोष्टीवर तीव्र आक्षेपही नोंदवला होता. मात्र, यानंतर काँग्रेसकडून याविषयी अजब स्पष्टीकरण देण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी सभागृहात उत्तर देताना म्हटले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील काही अवघड हिंदी शब्दांचा अर्थ राहुल गांधी यांना समजला नाही. त्यामुळेच राहुल गांधी मोबाईलमध्ये या शब्दांचे अर्थ शोधत होते, असे शर्मा यांनी सांगितले. 


राष्ट्रपतींनी भाषण सुरु केल्यानंतर पहिली २४ मिनिटे राहुल गांधी मोबाईलमध्ये काही तरी टाईप करत होते. त्यानंतर देखील त्यांनी राष्ट्रपतींचे भाषण ऐकण्याऐवजी ते शेजारी बसलेल्या सोनिया गांधी यांच्याशी बोलत होते. यावर आक्षेप घेतला असता राहुल यांनी राष्ट्रपतींच्या भाषणातील काही हिंदी शब्द अवघड असल्याचे कारण पुढे केले.


मात्र, राष्ट्रपतींच्या भाषणात सरकारी कामकाजासाठी वापरण्यात येणारे शब्द जाणीवपूर्वक टाळण्यात आले होते. त्यांनी सामान्य हिंदी भाषेतच संवाद साधला. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास राष्ट्रपतींनी भाषणात 'आधारभूत क्षेत्र', 'जलवायू परिवर्तन', 'प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण' या हिंदी शब्दांऐवजी 'इन्फ्रास्ट्रक्चर', 'क्लायमेट चेंज', 'डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर', 'मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नंस', 'नॅशनल हायवे', 'वन नेशन वन कार्ड', 'झीरो टॉलरन्स' असे शब्द वापरले होते. 


संसदेच्या प्रथेनुसार राष्ट्रपतींकडून अभिभाषण हिंदी किंवा इंग्रजीत वाचले जाते. यानंतर उपराष्ट्रपती अभिभाषणाच्या हिंदी किंवा इंग्रजीतील पहिल्या आणि शेवटच्या परिच्छेदाचे वाचन करत. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आतापर्यंत आपले प्रत्येक भाषण हिंदीतच केले आहे. यापूर्वी राष्ट्रपतींच्या हिंदी भाषणात सरकारी योजनांविषयी माहिती देताना जटील शब्दांचा वापर केला जात असे. मात्र, यावेळी त्यामध्ये जाणीवपूर्वक बदल करण्यात आले होते. 


मात्र, तरीदेखील राहुल गांधी यांना काही शब्दांचा अर्थ न समजल्याचे कारण देण्यात आल्याने त्यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित झाली आहे.