हैदराबाद: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लवकरच लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करताना दिसतील. कोणामध्ये हिंमत असेल तर त्यांना रोखून दाखवा, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी केले. सिद्धू सध्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी हैदराबादमध्ये आहेत. यावेळी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सिद्धू यांनी म्हटले की, मी राहुल गांधींचा सैनिक आहे. 'बुरे दिन जानेवाले है, राहुल गांधी आनेवाले है', हेच माझे घोषवाक्य आहे. लवकरच ते लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावतील, असा दावा सिद्धू यांनी केला. 



पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतल्याने सिद्धू यांच्यावर सध्या टीका होत आहे. या टीकाकारांचा समाचार घेताना सिद्धू यांनी म्हटले की, मी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधून परतल्यानंतर कर्तारपूर मार्गिकेविषयी (कॉरिडोर) बोललो होतो तेव्हा अनेकांनी माझी खिल्ली उडवली होती. मात्र, आज त्या लोकांना आपले शब्द मागे घ्यावे लागले आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मला पाकिस्तानात जाऊ नको, असे सांगितले होते. मात्र, त्याचवेळी काँग्रेसच्या अन्य २० नेत्यांनी मला इम्रान खान यांच्या शपथविधीला जायला सांगितले. केंद्रीय नेतृत्वानेही मला परवानगी दिली होती. कॅ. अमरिंदर सिंह मला वडिलांप्रमाणे असले तरी मी पाकिस्तानात जाणार हे त्यांना आधीच स्पष्ट केले होते, असे सिद्धू यांनी सांगितले.