कलबुर्गी : देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी (१७ मार्च) निधन झालं. कर्करोगाच्या प्रदीर्घ आजारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जनतेचा नेता गेला, अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी दिली. वयाच्या ६३ व्या वर्षी पर्रिकर यांनी अखेरचा श्वास घेतला. फेब्रुवारी महिन्यापासूनच त्यांना कर्करोगाचं निदान झालं आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळत गेली. ​लोकसभा निवडणुकीत मिशन साऊथ मार्गी लावण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दक्षिण भारतील राज्यांमध्ये दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी हैदराबाद-कर्नाटक क्षेत्रातील कलबुर्गीमध्ये निवडणूकीची प्रचार सभा घेतली. जनतेला संबोधित करण्याआधी राहुल गांधी यांनी दोन मिनिटाचे मौन राखून पर्रिकरांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोहर पर्रिकरांचे 63 व्या वर्षी रविवारी निधन झाले. ते गेल्या वर्षभरापासून कॅंसरशी लढा देत होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंचावर उपस्थित नेत्यांच्या उपस्थित मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पण केली. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी दोन मिनिटांचे मौन ठेवले. यातून देशाला राजकारणातून सकारात्मक संदेश राहुल गांधी यांनी दिला आहे. आयआयटी मुंबईमधून पदवी शिक्षण घेतलेल्या पर्रिकरांच्या जाण्याने देशाच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. फक्त राजकारणच नव्हे, तर कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतूनही पर्रिकर यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. पर्रिकर यांच्या निधनानंतर साऱ्या देशातून दु:ख व्यक्त करण्यात येत असून, सोमवार (१८ मार्च) हा दिवस राष्ट्रीय दुखवटा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. 



कलबुर्गी येथील लोकसभेच्या जागेवर तीन चरणांमध्ये 23 एप्रिलला मतदान होणार आहे. या जागेवर लोकसभेसाठी मल्लिकार्जुन खरगे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी खरगे यांच्या जागेतून निवडणुकीला सुरूवात केली आहे. यावेळी त्यांनी गुलबर्गामध्ये परिवर्तन रॅलीला संबोधित करुन मोदी सरकारवर निशाणा साधला. यासोबतच त्यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस महाआघाडी सरकाचे महत्त्व पटवून दिले. राहुल गांधी बंगळूरमध्ये तरुणांशी संवाद साधणार आहेत. 


मनोहर पर्रिकर आजारी असताना राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली होती. पर्रिकरांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाच्या वृत्ताने मी दु:खी आहे. ते वर्षभर साहसाने आपल्या आजाराशी लढत आले. इतर पक्षातील सर्वही त्यांचा आदर सन्मान करत असतं. ते गोव्यातील सर्वाधिक लोकप्रिय लोकांपैकी एक होते. मी त्यांच्या घरच्यांच्या दु:खात सहभागी आहे. अशा शब्दात राहुल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.