नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांतील कलगीतुरा वाढत जाईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोडत नाही. तर दुसरीकडे राहुल गांधींच्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी भाजपने कंबर कसलेली असते. देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत मोदींना शांतपणे झोपू देणार नाही, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. त्यावर लगेचच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्या भाषणाचा दर्जा खालावत चालला असल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक जीवनात देशाच्या पंतप्रधानांबद्दल इतक्या खालच्या दर्जाचे वक्तव्य आपण कधी ऐकले नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविशंकर प्रसाद म्हणाले, काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचारामुळे गेल्या ६० वर्षात देशातील जनता शांतपणे झोपलेली नाही. त्यामुळे अशा पक्षाच्या अध्यक्षांकडून अजून वेगळी अपेक्षाही ठेवता येणार नाही. राफेलच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्याशी संसदेमध्ये चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. आता त्यांनी धैर्य दाखवून आमच्या डोळ्यात डोळे घालून या विषयावर चर्चा करायला पुढे आले पाहिजे. चर्चेतून पाय काढून पळून जाणे त्यांना शोभणार नाही. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेते केवळ नाटक करीत असल्याचेही रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. गेल्या ७० वर्षांपैकी ६० वर्षे देशात काँग्रेसच सत्तेवर होती. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आता या मुद्द्यावरून केवळ नाटक केले जात आहे. 


नरेंद्र मोदी गेल्या साडेचार वर्षांपासून सत्तेत आहेत. पण या काळात त्यांनी शेतकऱ्यांचा एक रुपयाचेही कर्ज माफ केले नाही. कर्जमाफीसाठी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष सातत्याने शेतकऱ्यांसोबत राहतील. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी होत नाही. तोपर्यंत आम्ही त्यांना रात्री झोपू देणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.