नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी एका मर्यादाबाहेर जाऊन मोदींविरोधात नकारात्मक प्रचार केला. तसेच पुलवामा दहशतवादी हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राईकविषयी राहुल यांनी लावलेला सूर अयोग्य होता. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले, अशी कुजबूज आता दिल्लीत ऐकायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिल्लीत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ( CWC) बैठक होत आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले होते. त्यावेळी या नेत्यांमधील चर्चेचा कानोसा घेतला असता अनेकांनी काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल यांना जबाबदार ठरवले. 


यापैकी कोणत्याही नेत्याने काँग्रेसच्या संस्कृतीप्रमाणे याविषयी जाहीरपणे बोलण्यास नकार दिला. मात्र, या सगळ्यांचा एकूण सूर पाहता शनिवारी होणाऱ्या बैठकीत काहीतरी मोठे घडण्याची शक्यता आहे. 


राहुल गांधी यांनी सातत्याने 'चौकीदार चोर है' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेला प्रचार नकारात्मक होता. तसेच राहुल गांधी यांना केंद्रस्थानी ठेवून काँग्रेसचे पुनरुज्जीवन करणे खूपच कठीण आहे. कारण लोकांना घराणेशाहीच्या राजकारणाचा प्रचंड तिटकारा आलाय. त्यामुळे जनता विशेषत: तरुण वर्ग पुन्हा हे सगळे स्वीकारणार नाही, असे एका नेत्याने सांगितले. 


कोण आहे महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकमेव विजयी उमेदवार


याशिवाय, राहुल गांधी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राईकसंदर्भात घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची होती. राहुल यांनी अधिक संवेदनशीलपणे हा मुद्दा हाताळायला हवा होता. या सगळ्यात सॅम पित्रोदा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची भर पडली. याचाच फायदा भाजपने उचलला. परिणामी लोकांमध्ये काँग्रेसविरोधी भावना तयार झाली. लोकांनी भाजपच्या उमेदवारांकडे पाहून नव्हे तर नरेंद्र मोदी यांना मत दिले, असे या नेत्यांनी सांगितले. 


दरम्यान, आजच्या बैठकीत राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. अर्थात तो स्वीकारला जाणार नाही. मात्र, या बैठकीत काँग्रेसच्या पुनर्बांधणीसाठी मोठ्या बदलांची घोषणा होऊ शकते. जेणेकरून लोकांचे लक्ष दुसऱ्या ठिकाणी वळवता येईल. त्यासाठी संघटनेत नव्या पदांची निर्मिती होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.


माझे लाड करायला कुठल्याही आजोबांची गरज नाही- सुजय विखे पाटील