नवी दिल्ली : संसदेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट बरीच गाजली... परंतु, ही 'गळाभेट' अगोदरपासूनच 'प्लान' केलेली होती, असं काँग्रेसच्या सूत्रांकडूनच कळतंय. राहुल गांधींनी अचानक घेतलेली मोदींची 'गळाभेट' उत्स्फुर्त असल्याचं म्हटलं जात होतं... परंतु, या गळाभेटीची योजना राहुल गांधींच्या मनात बऱ्याच आधीपासून घोळत होती, असं काँग्रेसच्या सूत्रांचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेब्रुवारीमध्ये संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणा दरम्यान ही योजना तयार झाली होती. जेव्हा पंतप्रधान मोदी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन करत होते तेव्हाच राहुल गांधींच्या मनात हा विचार पहिल्यांदा आला होता. त्यावेळीही मोदींनी काँग्रेसवर एका कुटुंबासाठी काम करण्याचा आरोप केला होता.


'बोलताना मोदींनी जवाहर लाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राहुल गांधींना हा विचार आला होता की, मोदी फारच रागात असतील तर त्यांना एका 'झप्पी'ची गरज आहे... एकमेकांचे विचार परस्परविरोधी असले तरीदेखील ते कोणत्याही द्वेषाशिवाय व्यक्त केले जाऊ शकतात, असं यावेळी राहुल गांधींना सांगायचं होतं' असं काँग्रेस सूत्रांचं म्हणणं आहे. 


मोदींना झप्पी द्यायचं त्यांच्या मनात काही काळापासून होतं... पण नेमकं कधी हे मात्र ठरलेलं नव्हतं... त्यामुळे अविश्वास प्रस्तावा दरम्यान भाषण झाल्यानंतर त्यांनी मोदींची गळाभेट घेतली. 


राहुल गांधींच्या या 'जादू की झप्पी'नं भाजप नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का दिला होता.