पोलीस अधिकाऱ्याच्या घरात धाड, सापडल्या लाखोंच्या नव्या आणि जुन्या नोटा
पोलीस रक्षकांनाही काढलं घराबाहेर
पटना : एसएसपी विवेक कुमार यांच्या घरात टाकलेल्या धाडीत ६.२५ लाख रोख, ५.५० लाखांचं सोनं आणि जवळपास ४५ हजारांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. बिहारमधील मुजफ्फरपूरचे एसएसपी विवेक कुमार यांच्या घरी छापा टाकण्यात आला. यूपीतील त्यांच्या घरांवर छापेमारी सुरु आहे. सहारनपूर, मुजफ्फरनगरमधील घरांचा यामध्ये समावेश आहे. विवेक कुमार लवकरच केंद्रीय प्रतिनियुक्तीवर जाणार होते असं बोललं जात होतं. पण आता या छापेमारी नंतर प्रतिनियुक्ती होणं कठीण झालं आहे.
विवेक कुमार २००७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते मुजफ्फरपूरमध्ये एसएसपी आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर दारू विक्रेत्यासोंबत संबंध आणि पोस्टिंगसाठी पैसे घेण्याचा आरोप होता. विवेक कुमार तेव्हा चर्चेत आले होते जेव्हा त्यांनी पानापूरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याल फक्त एक दिवसासाठी पोलीस स्थानकाचा अधिक्षक बनवलं आणि नंतर त्यांना हटवलं होतं. यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्य़ाने आत्महत्या केली होती. तेव्हा त्यांच्या पत्नीने विवेक कुमार यांच्यावर आरोप केले होते.
मुजफ्फरपूरमधील घरावर सोमवारी दुपारी अचानक धाड टाकण्यात आली. बराच वेळ ही छापेमारी चालली. घरात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा सापडल्या. घरातील सर्व गार्ड्सला घरातून बाहेर काढण्यात आलं. स्पेशल विजिलेंसचे आयजी रत्न संजय यांच्या नेतृत्वात एसएसपी विवेक कुमार यांच्या घरात ही धाड टाकण्यात आली.