सिरसा : बलात्कारप्रकरणी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या बाबा राम रहीमबाबतचे वाद काही संपता संपत नाहीयेत. सिरसाच्या बाबा रहीमच्या डेरा मुख्यालयावर पोलिसांनी छापा मारला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावर हत्यारं सापडली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम रहीमबाबत निर्णय यायच्या आधीच सिरसा आणि इतर जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी सगळी हत्यारं जमा करायला सांगितली होती. असं असलं तरी देखील डेरा मुख्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडला आहे. सोमवारी पोलिसांनी डेरा मुख्यालयामध्ये छापा टाकला असताना जवळपास ३४ हत्यारं जप्त केली आहेत. यामध्ये बंदूक, पिस्तूल आणि कार्बाईन मिळाले आहेत.


२५ ऑगस्टला सीबीआयच्या स्पेशल कोर्टानं राम रहीमला दोषी ठरवलं होतं. यानंतर हरियाणा, पंजाब, दिल्ली-एनसीआर आणि जम्मूमधल्या काही भागामध्ये हिंसा झाली होती. हरियाणाच्या पंचकूला, सिरसा, रोहतक, अंबाला, मनसा आणि पंजाबच्या संगरुर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. अनेक वाहनांना आग लावण्यात आली. पंचकूलामध्ये डेरा समर्थकांनी रहिवासी भागामध्ये जाऊन दंगा केला होता.


डेरा समर्थकांचा हा हिंसाचार बघून सुरक्षा यंत्रणांनी अश्रू धूर, हवेत गोळीबार आणि काही ठिकाणी गोळीबारही केला. या हिंसाचारामध्ये तब्बल ३८ जणांना जीव गमवावा लागला आणि ३०० पेक्षा जास्त जण जखमी झाले. सगळ्यात जास्त हिंसा पंचकूला आणि चंडीगढमध्ये झाली होती.