नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात एका आठवड्यामध्ये दोन रेल्वे अपघात घडले आहेत. यानंतर आता रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष एके मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मित्तल यांनी आपला राजीनामा रेल्वेमंत्र्यांना सोपवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एके मित्तल यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. मात्र, आठवड्यात दोन रेल्वे अपघात झाल्याने एके मित्तल यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.


उत्कल एक्सप्रेसच्या अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाने मित्तल यांच्यासह उत्तर विभागीय रेल्वेचे महाव्यवस्थापक आर के कुलश्रेष्ठ आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर एन सिंग यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं होतं.


शनिवारी मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खतौली येथे कलिंग-उत्कल एक्सप्रेसला अपघात झाला. या अपघातात २४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर, २०० हून अधिक जखमी झाले होते. त्यानंतर बुधवारी आजमगडहून दिल्लीला जाणा-या कैफियत एक्सप्रेसला अपघात झाला. या अपघातात ७०हून अधिक प्रवासी जखमी झाले.


या दोन्ही अपघातांनंतर रेल्वे अधिका-यांवर निष्काळजीपणाचा आरोप होत आहे. रेल्वे मंत्र्यांनी उत्कल एक्स्प्रेस अपघाताची जबाबदारी घेण्याचे आदेशही दिले होते.