रेल्वेचा नवा नियम ! ट्रेन पकड्यापूर्वी 20 मिनिटे आधी पोहोचा स्थानकात
आता रेल्वे पकडण्यासाठीही रेल्वे स्थानकात पोहोचणे आवश्यक असणार आहे.
नवी दिल्ली : फ्लाईट पकडण्याआधी सामान, कागदपत्र तपासणीसाठी थोडा वेळ एअरपोर्ट पोहोचणे गरजेचे असते. त्याप्रमाणे आता रेल्वे पकडण्यासाठीही रेल्वे स्थानकात पोहोचणे आवश्यक असणार आहे. रेल्वे स्थानकातील काही नियम बदलत आहेत. यामुळे प्रवेशापासून रेल्वे प्लॅटफॉर्म पर्यत पोहोचण्याचा वेळ वाढू शकतो. ही यंत्रणा सर्वात आधी इलाहाबाद रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात येत आहे. इथे कुंभ मेळ्यासाठी मोठ्या संख्येने यात्री पोहोचत असतात. यानंतर कर्नाटकच्या हुबळी रेल्वे स्थानावर नवी व्यवस्था लागू होणार आहे.
202 स्थानकांवर हा नियम
एअरपोर्ट प्रमाणे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सुरक्षा प्रक्रीयेतून जावे लागेल. ट्रेनच्या वेळेआधी प्रवाशांना स्थानकावर पोहोचणे गरजेचे आहे. एका विशिष्ट वेळेनंतर प्रवाशांचा प्रवेश बंद करण्यात येईल. सुरक्षा तपासणी करण्यासाठी प्रवाशांना 15 ते 20 मिनिटे आधी पोहोचावे लागेल. इलाहाबाद आणि कर्नाटक येथील पायलट प्रोजेक्ट नंतर 202 स्थानकांवर हा नियम लागू होणार आहे.
अवैध मार्ग बंद
रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी सध्या असलेले वेगवेगळे आणि अवैध मार्ग बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकात प्रवेशाचे मार्ग ठराविक असतील. अवैध मार्ग बंद झाल्याने प्रवेश द्वाराजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. प्रवेश द्वारासमोर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवली जाईल.
वेळेआधी पोहोचा
या सर्वामुळे प्रवाशांना जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासावेळी आधी 15 ते 20 मिनिटांचा वेळ काढून घरुन निघावे असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले. तपासणीसाठी लागणारा वेळ वाचवला तरच ट्रेन वेळेत पकडता येईल नाहीतर ट्रेन निघून जाण्याचा धोका असल्याचेही सांगण्यात आले.