रेल्वेकडून प्रवाशांना `मसाज` सेवा
भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मसाजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे, आणि ती म्हणजे... भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मसाजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची सेवा दिली जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या रतलाम मंडळानं हा प्रस्ताव तयार केला. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला इंदूरवरुन सुटणाऱ्या ३९ रेल्वे गाड्यांमध्येच उपलब्ध करुन दिली जाणार आहे. प्रवासादरम्यान कंटाळलेल्या प्रवाशांमधील शीण निघून जावा यासाठी ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
प्रत्येक गाडीत तीन ते पाच प्रशिक्षित मसाज करणाऱ्या व्यक्तींना नियुक्त करण्यात येणार आहे. मसाज करणाऱ्या या व्यक्ती प्रवाशांच्या सीटवर जाऊन सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच्या वेळेत त्यांना सेवा देतील. या सुविधेसाठी प्रवाशांना १०० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
मसाजसाठी रेल्वेने गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम ही तीन पॅकेजेस दिली आहेत. आगामी २० दिवसांमध्ये या विशेष सेवेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, तर तो देशातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर लागू करण्यात येईल. या सेवेतून रेल्वेला सुमारे २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी आशा आहे.