Indian Railway: आता एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस, काय आहे रेल्वेची नवीन योजना?
Indian Railway News: भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. अनेक स्थानकात बदल करण्यात आले तर दुसरीकडे रेल्वे आता विद्युतवाहिणीवर धावत आहे. त्यातच आता रेल्वे आणखी एक नवीन योजना आखत आहे. यामध्ये भविष्यात रेल्वे, बुलेट ट्रेन आणि हायस्पीड रेल्वे एकाच ट्रॅकवर चालवण्याची योजना आहे.
Indian Railway News In Marathi: आपल्या देशात अजूनही भारतीय रेल्वे हा सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम पर्याय म्हणून मानला जातो. देशातील बहुतांश लोक स्थलांतरासाठी रेल्वेवर अवलंबून असतात. जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. देशात रेल्वेचे जाळे सातत्याने विस्तारत असताना केंद्र सरकार नवनवीन प्रकल्प करत आहे. अशातच आता रेल्वे आगामी काळात दोन मोठ्या योजनांवर काम करत आहे. या योजनेमध्ये रेल्वेचा उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅक) उभारण्याचा मानस आहे. या योजनेमुळे बुलेट ट्रेन, हायस्पीड, सेमी हायस्पीड आणि नॉर्मल स्पीड ट्रेनसाठी वेगळे ट्रॅक न बनवता सर्व स्पीड ट्रेन एकाच ट्रॅकवर चालवण्याचा प्रयत्न असणार आहे.
दरम्यान रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी विद्यमान संसाधनांचा सर्वोत्तम कसा उपयोग करता येईल हे सांगितले असून भविष्यात नवीन रेल्वे मार्ग हे उन्नत रेल्वे ट्रॅक असणार आहे. यासाठी रेल्वेचा प्रयत्न असून यासाठी मसुदाही तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅकची उंची जमिनीपासून चार मीटर उंच ठेवण्यात येणार आहे. यामध्ये एलिव्हेटेड ट्रॅकची रचना सिंगल किंवा डबल लाईननुसार न करता चार लाईननुसार केली जाईल जेणेकरून कमी खर्चात जास्तीत जास्त गाड्या चालवता येतील.
रेल्वेचा एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅक सुरु झाल्यानंतर याचे अनेक फायदे रेल्वेला होणार आहे. जसे की, सध्याच्या रेल्वे रुळावर दिवसाला अपघातांची मोठी संख्या असते. कधी कोणी रुळ ओलाडंताना, रेल्वेमधून पडून, रेल्वे रुळांवर प्राणी देखील येत असता, अशा अनेक कारणांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. या अपघातामुळे रेल्वेचा वेग ही कमी होता. त्यामुळे रेल्वेला लेटमार्कचा फटका बसतो, तर काहीवेळा रेल्वे रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर येते. या सर्व बाबी लक्षात घेऊन भविष्यातील नवीन रेल्वे रुळ हे उन्नत असतील ते जमिनीपासून किमान चार मीटर उंचीवर असावेत, असे नियोजन रेल्वेने केले आहे.
सर्व गाड्या एकाच रुळावरून धावतील
यामध्ये भुयारी मार्ग, रस्ते आणि कल्व्हर्ट लोकांच्या ये-जा आणि वाहतुकीच्या गरजेनुसार बांधले जातील. गरजेनुसार भारदस्त रेल्वे मार्गांची उंचीही वाढवता येऊ शकते. जेणेकरून बस, ट्रक आणि इतर प्रकारची उंचावरील वाहने सहज जाऊ शकतील. याशिवाय भविष्यात बांधण्यात येणारे रेल्वे ट्रॅक हे बहुउद्देशीय असावेत, अशा आणखी एका योजनेवर रेल्वे काम करत आहे. म्हणजे बुलेट ट्रेन, हाय स्पीड, सेमी हाय स्पीड आणि नॉर्मल स्पीड ट्रेन एकाच ट्रॅकवर धावू शकतात. त्यासाठी परदेशाच्या धर्तीवर भारतातही असेच ट्रॅक तयार करण्याचा विचार सुरू आहे.
या प्रकल्पाचा काय फायदा होणार?
उन्नत रेल्वे रुळांच्या बांधणीमुळे गाड्यांची गती वाढेल. तसेच रेल्वे रद्द, लेटमार्क याचे प्रमाण कमी होईल. उंचावलेल्या ट्रॅकमुळे त्यांना कुंपण घालणे देखील सोपे होईल, जे जमिनीवर बांधल्यास सध्या शक्य नाही. जिथे रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना काटेरी तारांचे कुंपण किंवा भिंती बांधते, लोकवस्तीच्या भागात अनेक ठिकाणी लोक त्यांच्या प्रवासासाठी मार्ग काढण्यासाठी त्यांना तोडतात. जुना रेल्वे मार्ग हळूहळू उन्नत करण्याची योजना आहे.