अंदमानात पावसाचं आगमन लवकरच, राज्यातील या 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
वाढत्या उष्णतेमुळे सर्वच पावसाची आतुरनेते वाटत पाहतायेत. याच पावसाबाबत (Rain Update 2022) मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबई : वाढत्या उष्णतेमुळे सर्वच पावसाची आतुरनेते वाटत पाहतायेत. याच पावसाबाबत (Rain Update 2022) मोठी बातमी समोर आली आहे. पावसाबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. मोसमी पाऊस पुढील 24 तासांमध्ये अंदमानात दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविलीय. (rain update 2022 chance of torrential rain with thunderstorm in 9 districts of maharashtra forecast from meteorological department)
तसेच केरळ किनारपट्टीवर पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच राज्यातील 9 जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असून मोसमी पाऊस चोवीस तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसांत जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या दक्षिण भारतामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. राज्यातील काही जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मान्सून अंदमानच्या दिशेने निघाल्याने दक्षिण भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळात अतिवृष्टी सुरू आहे. आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम
उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. तिथे कमाल तापमानाचा पारा हा 45 ते 49 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचलाय. त्यामुळे तिथल्या स्थानिकांची लाहीलाही झाली आहे.
राज्यातील या जिल्ह्यांना इशारा
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये 4 दिवसांचा यलो अलर्ट दिला आहे.
या 9 जिल्ह्यांमध्ये येत्या 16 ते 19 या दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.