BJP MLA Balmukund: राजस्थान, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार विजय मिळवला. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत 199 जागांपैकी भाजपने 115 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. राजस्थानसह छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये विजयानंतर भाजपमध्ये आनंदाची लाट आहे. दरम्यान, राजस्थानमधील भाजप आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक भगवे वस्त्रधारी आमदार निवडून आल्या आल्या अॅक्टीव्ह मोडमध्ये दिसत आहेत. हे आमदार अधिकाऱ्यांना फोन स्पिकरवर टाकून खडसावत आहेत. तुम्ही लाईव्ह आहात मला आजच्या आज निर्णयाची अंमलबजावणी हवीय, असा दम भरत आहेत. काय आहे हे प्रकरण? कोण आहेत हे आमदार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार बालमुकुंद आचार्य हे जयपूरच्या हवा महल मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. यानंतर लगेचच आमदार बालमुकुंद आचार्य कामाला लागले आहेत. सोमवारी बालमुकुंद आचार्य आपल्या समर्थकांसह जयपूरच्या परकोटे भागात पोहोचले. तेथे ते मांसाहारी दुकानांवरील कारवाईसाठी आक्रमक झालेले दिसले. येथे रस्त्यावर त्यांना नॉन वेजचे दुकान दिसल्यानंतर त्यांच्या संताप अनावर झाला. त्यांनी तात्काळ महापालिकेच्या व्हिजिलंस अधिकाऱ्याला फोन करुन खडसावले. एवढेच नव्हे तर रस्त्यांवरून मांसाहाराचे स्टॉल हटवण्याचा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.


आचार्य बालमुकुंद भडकले



आपल्या विधानसभा क्षेत्रात रस्त्यावर मांसाहारची दुकाने असू नयेत.  संध्याकाळपर्यंत सर्व रस्ते स्वच्छ करावेत, असे भाजपचे आमदार बालमुकुंद आचार्य यांनी सरकारी अधिकाऱ्याला बोलावून खडसावले. ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बालमुकुंद आपल्या समर्थकांसोबत उभे आहेत. ते फोनवरुन अधिकाऱ्यांना झापत असल्याचे दिसत आहेत. 


बालमुकुंद यांनी अधिकाऱ्याला खडसावले


बालमुकुंद यांनी अधिकाऱ्याला फोन करुन भर रस्त्यावर खुलेपणे मांसाहार विकता येतो का? अशी विचारणा केली. हो किंवा नाही म्हणा... मग तुम्ही त्याचे समर्थन करत आहात का?  असा थेट प्रश्नच त्यांनी केला. तत्काळ प्रभावाने, रस्त्यावरील सर्व मांसाहारी गाड्या हटवा. इतकंच नाही तर मी संध्याकाळी अहवाल घेईन आणि अधिकारी कोण आहे याची मला पर्वा नाही, असंही त्यांनी सांगितलं. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. काही जण आमदारांवर टीका करत आहेत तर काही त्यांच्या निर्णयाचे कौतूक करत आहेत. निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी आमदार महोदयांनी निर्णय घ्यायला सुरुवात केल्याने आता पुढे आणखी कोणते आणि कशा पद्धतीने निर्णय घेतले जाणार? याचा अंदाज नागरिक लावत आहेत.