जयपूर: राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी जाहीर होणाऱ्या निकालापूर्वीच काँग्रेसकडून राज्यात विजयाचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. जयपूर येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाला रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास असल्याचे चित्र दिसत आहे. वसुंधरा राजे यांनी १३ डिसेंबर २०१३ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, यंदाचा १३ डिसेंबरपासून त्यांच्या सरकारची उलटी गिनती सुरु होईल, असे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस महेश शर्मा यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राजस्थानचा रणसंग्राम - राजस्थानचा सम्राट कोण ?


राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. गेल्याच आठवड्यात या राज्यांमधील एक्झिट पोल जाहीर झाले होते. यामध्ये जवळपास सर्वच सर्वेक्षण संस्थांनी राजस्थानमध्ये सत्ताबदल होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे राजस्थानमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे. तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळेल, असा अंदाज आहे. याठिकाणी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तरी त्यांच्या जागा कमी होतील. लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर तिन्ही राज्यांमधील हे यश राहुल गांधी यांच्या प्रतिमानिर्मितीसाठी फायदेशीर ठरले, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.