वसुंधरा राजे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, काँग्रेसला दिल्या शुभेच्छा!
राजस्थानमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला सत्तेवरुन खाली खेचले. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपला आहे.
जयपूर : राजस्थानमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत भाजपला आपली सत्ता टिकवता आलेली नाही. काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला सत्तेवरुन खाली खेचले. भाजपचा दारुण पराभव झाल्याने भाजपच्या गोटात शांतता आहे. दरम्यान, राजस्थानच्या मावळत्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पराभव मान्य केला आहे. मला जनतेचा कौल मान्य आहे, अशी प्रतिक्रिया राजे यांनी दिलेय. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपला आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा मोठा पराभव झालाय. भाजपला ७३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये १६३ जागा मिळाल्या होत्या. राजस्थानमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. आता भाजपला निम्याही जागा मिळवता आलेल्याही नाहीत. यावेळी मात्र ९९ जागांवर काँग्रेसला निवडत राजस्थानच्या जनतेने काँग्रेसच्या हाती सत्तेची चावी दिली आहे.
या निवडणुकीतलोकांनी जो कौल दिला आहे, तो मला मान्य आहे. मी जनमत स्वीकारले आहे, असे राजे यांनी म्हटले आहे. राजस्थानच्या जनतेसाठी विकासकामे केली आहेत. आता सत्तेवर येणारा पक्षही राजस्थानच्या विकासात हातभार लावेल, अशी अपेक्षा व्यक्त करत काँग्रेसला शुभेच्छा दिल्यात.
दरम्यान, मावळत्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे या झालरपाटण मतदारसंघातून वसुंधरा राजे विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसचे मानवेंद्र सिंह यांचा पराभव केला.