जयपूर : राजस्थानमध्ये २७ जागांसाठी स्थानिक स्वराज संस्थामध्ये निवडणूक झाली. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका पोटनिवडणुकांचा समावेश होता. यामध्ये १३ जागांवर भाजपने विजय संपादन केलाय. मात्र, ११ ठिकाणी काँग्रेसने बाजी मारत भाजपला जोरदार टक्कर दिली. राज्यात जिल्हा परिषदेसाठी एका जागेसाठी, पंचायत समितीसाठी १७ जागांसाठी तर नगरपालिका आणि नगर परिषदेच्या ९ जागांसाठी ही निवडणूक झाली. गुरुवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात भाजपने ११ पंचायत समिती आणि दोन नगरपालिकेच्या जागांवर विजय संपादन केला. तर एका नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने विजय मिळवला. तर पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत प्रत्येकी एका जागावर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्ष काँग्रेसने सवाई माधोपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या वॉर्ड ८ मध्ये जोरदार विजय मिळवत ही जागा आपल्याकडे राखली. काँग्रेसचे उमेदवार लोकेश यांनी भाजपचे उमेदवार कमल यांचा ३५८ मतांनी पराभव केला. काँग्रेसने पंचायत समितीच्या ५ जागावर आणि ५ नगरपालिकेच्या जागांवर विजय मिळवला.


स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीतील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजप प्रदेश महासचिव भजनलाल शर्मा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, लोकांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवलाय. त्यामुळे १३ जागांवर भाजपने विजय मिळवलाय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी म्हटलेय, शहरी मतदारांनी सत्ताधारी भाजपविरोधात मतदान केलेय. समाजकल्याणकारी योजना राबविण्यात भाजपला अपयश आलेय. त्यामुळे लोकांनी भाजपला नाकारलेय.