नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) हल्ला चढवला आहे. भाजपा प्रणित केंद्र आणि एनडीए सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मजबूत पकड आहे. संघ ही संविधानेत्तर यंत्रणा म्हणून काम करत आहे. आरएसएसच्या  परवानगी शिवाय कोणी पंतप्रधान होऊ शकत नाही असे विधान गुरुवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी केले. आरएसएसला राजकीय पक्ष म्हणून समोर येत भाजपा सोबत युती करायला हवी. केंद्रातील एनडीए सरकारवर आरएसएसची मजबूत पकड आहे. ते संविधानेत्तर यंत्रणा म्हणून काम करतात. आरएसएसला विचारल्या शिवाय भाजपामध्ये कोणी मुख्यमंत्रीही होऊ शकत नाही. सध्याची स्थिती पाहता मला वाटते की त्यांनी राजकीय पक्ष म्हणून समोर यायला हवे. आम्हाला त्यामुळे कोणतीच अडचण नसेल असेही गहलोत म्हणाले. 




आम्ही राजकारणात येणार नाही केवळ सांस्कृतिक गठबंधन करु असे आरएसएसने आधीच स्पष्ट केले आहे. आरएसएस ही एक सांस्कृतिक संघटना आहे. याचा राजकारणाशी फारसा संबंध नाही. पण यांच्यावर जेव्हा बंदी घालण्यात आली होती तेव्हा आपण राजकारणात उतरणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. आता आरएसएसला स्वत:च्या शब्दावर कायम राहायला हवे असेही गहलोत म्हणाले.