शुभमंगल सावधान ! पोलीस अधिकाऱ्याला प्री वेडिंग शूट पडलं महागात
प्री वेडिंग शूट फारच महागात पडलं.
मुंबई : सध्या जमाना प्री वेडिंग शूटचा आहे. म्हणजे लग्नाच्या आधी वधू-वरांचं फोटोसेशन आणि व्हिडिओ काढण्याचा नवा ट्रेंड. थोडीशी गम्मत जम्मत म्हणून सुरू झालेला हा ट्रेंड कधी कधी अंगलटही येऊ शकतो. राजस्थानातल्या एका पोलीस अधिकाऱ्याला हे प्री वेडिंग शूट फारच महागात पडलं.
सध्या लग्नापेक्षाही एक मोठ्ठा सोहळा असतो. प्री वेडिंग शूट म्हणतात त्याला.... म्हणजे एकमेकांनी लग्नाच्या आधी हातात हात घेऊन चालायचं, एकमेकांकडे गोंडसपणानं पाहायचं... आणि रोमँटिसिझम का काय म्हणतात, त्याच्या जेवढ्या मर्यादा चारचौघांत ओलांडता येतील, तेवढ्या ओलांडायच्या आणि ते सगळं शूट किती छान म्हणत सगळ्यांनी कौतुकानं पाहायचं. अशीच एक प्री वेडिंग शूटची भन्नाट आयडिया राजस्थानातल्या पोलिसाला सुचली. ते होते चक्क पोलीस उपनिरीक्षक साहेब धनपत सिंग. आयडिया पण असली भारी की त्यामुळे अडचणीतच आली नवरदेवाची स्वारी.
या धनपत सिंगांची होणारी नवरी स्कूटरवरुन येते. तिनं हेल्मेट घातलं नाही, म्हणून तिला पोलीस अडवतात आणि ती पोलिसाला चक्क लाच देते. लाच देताना पोलिसाचं पाकीट पळवते आणि सुरू होते ही सो कॉल्ड लव्ह स्टोरी.
प्री वेडिंग शूटमध्ये अकलेचे तारे तोडून झाल्यावर खरे तारे डोळ्यासमोर चमकायची आता या पोलिसासमोर वेळ आलीय. कारण साहेबांनी या व्हिडीओमध्ये चक्क खाकी वर्दी वापरली आणि लाचखोरीही दाखवली. मग काय, पोलिसातल्याच एकानं कळ काढली आणि मोठ्या साहेबांना व्हिडिओ दाखवला. मामला पार पोलीस महानिरीक्षकांपर्यंत गेला. आता लग्नाचे फेरे राहिले बाजूला आणि पोलीस साहेबांच्या मागे लागलेत चौकशीचे फेरे. शुभमंगल... सावधान....