राजस्थानमध्ये गर्भवती महिलेला निर्वस्त्र करुन पतीने गावभर फिरवले; कुटुंबीय काढत होते व्हिडीओ
Rajasthan Crime : राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात गर्भवती महिलेची नग्न धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असून शुक्रवारी या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Crime News : राजस्थानच्या ( Rajasthan) प्रतापगड (Pratapgarh) जिल्ह्यातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. प्रतापगडमध्ये एका गर्भवती महिलेला निर्वस्त्र करत तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ( Rajasthan Police) आठ आरोपींची ओळख पटवली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनीही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटला घडली आहे. 31 ऑगस्ट रोजी एका महिलेला तिच्या पतीने विवस्त्र करून संपूर्ण गावात फिरवले होते. गरोदर महिलेला विवस्त्र करून गावभर फिरण्यात आल्याचा धक्कादायक समोर आल्यानंतर राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे. महिलेला विवस्त्र केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये महिला रडताना दिसत आहे. महिलेला तिचा पती आणि कुटुंबीयांनी विवस्त्र करून मारहाण केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रतापगडचे पोलीस अधिक्षक गावात पोहोचले आहेत. त्याचवेळी बांसवाडा रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांही या प्रकरणाची दखल घेत आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं काय घडलं?
प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड शहरातील पहाडा गावातील असून चार दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार घडला आहे. पीडित महिलेचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. तिचे जवळच्या गावात राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. चार दिवसांपूर्वी ती तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. ही बाब घरच्यांना कळताच त्यांनी महिलेचा पाठलाग करून तिला पकडले. यानंतर गर्भवती महिलेला गावात आणण्यात आले. महिलेला तिच्या पतीने विवस्त्र केले. यामध्ये महिलेचे आई-वडील आणि इतर कुटुंबीयांचाही सहभाग होता. त्यानंतर महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण करून गावात फिरत असल्याचा व्हिडिओ शुक्रवारी संध्याकाळी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे.
व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक अमित कुमार रात्री उशिरा गावात पोहोचले होते. ज्या महिलेसोबत ही लाजिरवाणी घटना घडली, तिचे लग्न वर्षभरापूर्वीच या गावातील तरुणाशी झाले होते, असे त्यांनी सांगितले. 31 ऑगस्ट रोजी सासरच्यांनी पीडित महिला आणि तिच्या प्रियकराला पकडले. यानंतर पतीने महिलेला गावकऱ्यांसमोर नग्न केले. व्हिडिओमध्ये महिला ओरडत आहे आणि तेथून जाऊ देण्याची विनंती करत आहे. तिचा पती तिला जबरदस्तीने गर्दीत नेतो आणि गावभर तिची धिंड काढतो. या वेळी गावातील अनेक लोक उपस्थित होते, पण कोणीही त्याला अडवले नाही. यादरम्यान महिलेला मारहाणही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश
"प्रतापगड जिल्ह्यात पेहार आणि सासरच्या लोकांमधील कौटुंबिक वादामुळे एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी विवस्त्र केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पाठवून याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुसंस्कृत समाजात अशा गुन्हेगारांना स्थान नाही. या गुन्हेगारांना लवकरात लवकर तुरुंगात टाकले जाईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल," असे ट्वीट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.