धक्कादायक! 500 रुपयांना मुलांची विक्री; 18-18 तास करायला लावायचे काम अन्...
Rajasthan Crime : राजस्थानच्या जयपूरमधून पोलिसांनी 22 मुलांची सुटका केली आहे. या मुलांकडून बालमजुरी करवून घेतली जात होती. या मुलांकडून लाखेपासून दागिने बनवून घेतले जात होते. या मुलांना प्रत्येकी पाचशे रुपयांना विकत घेतल्याचीही माहिती आहे.
Crime News : राजस्थानमधून (Rajasthan News) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या जयपुरमध्ये पोलिसांनी तब्बल 22 बालमजुरांची (Child Labour) सुटका केली आहे. गेल्या वर्षभरापासून ही मुले एकाच खोलीत राहून काम करत होती. धक्कादायक बाब म्हणजे बिहारमधल्या (Bihar Crime) या मुलांची अवघ्या 500 रुपयांना विक्री करण्यात आली होती. 9 ते 16 या वयोगटातील ही मुले असल्याची माहिती समोर आली आहे. या मुलांकडून तब्बल 18 तास काम करवून घेतले जात होते अशीही माहिती उघड झाली आहे. पोलीस (Rajasthan Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुलांची सुटका करण्यात आली आहे ते सर्व बिहारमधील सीतामढी आणि मुझफ्फरपूर येथील रहिवासी आहेत.
12 जून रोजी जयपूर येथील भट्टबस्ती येथून पोलीस आणि एका संस्थेने 22 मुलांची सुटका केली आहे. या मुलांकडून जबरदस्तीने लाखेपासून दागिने बनवून घेतले जात होते. खेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात या मुलांकडून बळजबरीने 18 तास काम करवून घेतले जात होते. अखेर पोलिसांनी बिहारमधल्या या मुलांची सुटका केली आहे. या मुलांना खाण्याच्या नावावर फक्त
खिचडी दिली होती. मुलांनी सांगितले की शाहनवाज उर्फ गुड्डू नावाच्या व्यक्तीने त्यांच्या पालकांना प्रत्येकी 500 रुपये देऊन विकत घेतले आणि बिहारमधून येथे आणले होते.
11 मुले कुपोषित
ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. मुलांच्या सुटकेसाठी पोलिसांचे पथक आल्याची माहिती मिळताच शाहनवाज आणि त्याची पत्नी घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सर्व मुलांची सुटका केली. यानंतर मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत 11 मुले कुपोषित आढळून आली आहेत. या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलांना अनेक दिवस अंघोळही करू दिली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुलांना विविध आजार देखील जडल्याचे समोर आले आहे.
मुलांना सुरु होती मारहाण
तपासणीदरम्यान, एका मुलाने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. बांगडीला मोती नीट न लावल्याने काही दिवसांपूर्वी शाहनवाजने त्याला बेदम मारहाण केली होती. माहिती मिळाली. आरोपीने आधी मुलाला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर छातीवर लाथ मारली. मुलगा त्रास होत असल्याने ओरडत होता, मात्र आरोपी शाहनवाज थांबला नाही. तपासणी दरम्यान, मुलाची अवस्था पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला होता.