जयपूर: राजस्थान विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन सत्राला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. यावेळी गेहलोत सरकार अपेक्षेप्रमाणे विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले. सचिन पायलट यांचे बंड संपुष्टात आल्यामुळे आता गेहलोत सरकारसाठी विधानसभेत बहुमत सिद्ध करणे, ही केवळ औपचारिकता आहे. मात्र, यावेळी सचिन पायलट यांच्या सभागृहातील बदललेल्या स्थानाविषयी चांगलीच चर्चा रंगली होती. पायलट यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसने राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून त्यांची उचलबांगडी केली होती. यानंतर त्यांची सभागृहातील जागाही बदलण्यात आली. त्यामुळे सचिन पायलट यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, सचिन पायलट यांनी प्रसारमध्यमांसमोर अत्यंत चतुराईने उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, मी यापूर्वी सभागृहात ज्या जागेवर बसत होतो, ती सुरक्षित होती. त्यामुळे मला दुसरी जागा का देण्यात आली, याबद्दल मी विचार केला. मी नव्या जागेकडे पाहिले तेव्हा ही जागा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी बाकांच्या सीमारेषेवर असल्याचे माझ्या लक्षात आले. सीमेवर कोणाला पाठवले जाते? तुमच्याकडील सर्वोत्तम योद्ध्याला, असे पायलट यांनी म्हटले. 

याशिवाय, गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या प्रकाराविषयी पायलट यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मी किंवा माझा कोणीही मित्र असेल, आम्ही 'डॉक्टरांचा' सल्ला घेतला आहे. या उपचारानंतर आज आम्ही १२५ जण सभागृहात उभे आहोत. कदाचित सीमारेषेवर (सभागृहातील) शस्त्रास्त्रांचा जोरदार मारा होईल. मात्र, अशावेळी आम्ही चिलखत होऊन सर्वकाही सुरक्षित ठेवू, असे सचिन पायलट यांनी सांगितले. 



दरम्यान, आज सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजपवर हल्ला चढवण्यात आला. मध्य प्रदेश, मणिपूर आणि गोव्याप्रमाणे केंद्र सरकारला राजस्थानमधील सरकार पाडायचे होते. मात्र, राजस्थानमध्ये हा प्रयत्न असफल ठरल्याची टिप्पणी संसदीय कामकाज मंत्री शांती धारीवाल यांनी केली. 

राजस्थान विधानसभेच्या एकूण २०० जागांपैकी १०७ जागा काँग्रेसकडे आहेत. तर भाजपकडे ७२ आमदारांचे संख्याबळ आहे. पायलट यांच्या बंडानंतर काँग्रेसचे १९ आमदार फुटतील, असे सांगितले जात होते. मात्र, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पायलट यांनी बंडांची तलवार म्यान केली. त्यामुळे तुर्तास गेहलोत सरकारवरील गंडांतर टळले आहे.