नवी दिल्ली : गुजरातच्या राजकोटमध्ये माणूसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची टेरेसवरून फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 


दोन महिन्यांनी घटना उघड...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यक्तीच्या आईला ब्रेन हॅमरेज झाला होता आणि अशात तिची काळजी घेण्याचे सोडून त्याने आईलाच छतावरून फेकून तिची हत्या केली. ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमुळे ही घटना आता उघडकीस आली आहे. आरोपी मुलगा असिस्टंट प्रोफेसर आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा मुलगा त्याच्या आईला छतावर घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सुरुवातीला सगळ्यांना वाटले की, त्याची आई छतावरून पडली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. पण या महिलेच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आणि नंतर सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर सगळा प्रकार समोर आला.  


सर्वांना वाटली आत्महत्या


मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांआधी राजकोटच्या गांधीग्रामच्या दर्शन अ‍ॅवेन्यूमध्ये राहणा-या निवॄत्त शिक्षिका जयश्रीबेन विनोदभाई नाथवानी(६४) यांचा इमारतीच्या छतावरून पडून मृत्यू झाला होता. हे प्रकरण पोलिसांनी आत्महत्या मानून सोडून दिलं होतं. पण आता साधारण दोन महिन्यांने पोलिसांना एक चिठ्ठी मिळाल्याने त्या आधारावर त्यांनी पुन्हा चौकशी सुरू केली आहे. 


सीसीटीव्ही फुटेज ठरलं महत्वाचं


जेव्हा पोलिसांनी सोसायटीत लावण्यात आलेलं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, तेव्हा ते हैराण झाले. सीसीटीव्हीत या महिलेचा मुलगा संदीप आपल्या आईला लिफ्टमधून छतावर घेऊन जाताना दिसला. पोलीस चौकशीत आधी आरोपी मुलाने पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना त्यांचा हिस्का दाखवल्यावर त्याने सगळा प्रकार सांगितला. 


कबूल केला गुन्हा


राजकोट डीसीपी करनराज वाघेला यांनी सांगितले की, संदीप आधी खोटं सांगत होता. त्याने आधी सांगितले की, तो आईला पूजेसाठी घेऊन गेला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला विचारले की, आईने अडीच इंचाची रेलिंग कशी पार केली. तेव्हा तो गप्प झाला. नंतर पोलिसांनी त्याला हिस्का दाखवला तेव्हा त्याने आईला छतावरून फेकल्याचे कबूल केले. त्याने सांगितले की, आईच्या आजाराने परेशान झाला होता.