नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यात फोनवर काही बाचाबाची झाल्याची माहिती मिळते आहे. एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, पश्चिम बंगालच्या कांथीमध्ये झालेल्या भाजपच्या रॅलीनंतर राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी यांना फोन केला होता. राजनाथ सिंह यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर आणि भाजपच्या रॅलीनंतर झालेल्या हिंसेबाबत चिंता व्यक्त केली होती. पण सूत्रांच्या माहितीनुसार यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजनाथ सिंह यांना उत्तर दिलं की, तुम्ही आधी तुमच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांभाळा. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची मंगळवारी कांथी येथे रॅली झाली होती. या रॅलीनंतर काही बसेसवर हल्ला झाला होता. अनेक मोटरसायकली जाळण्यात आल्या होत्या. परिस्थिती बिघडताच येथे सुरक्षा वाढवण्यात आली होती.
 
तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. तृणमूल काँग्रेसने म्हटलं की, ही संपूर्ण घटना आधीच रचली गेली होती. तर भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी टीएमसीला तालिबानी असल्याचं म्हटलं होतं. रॅलीनंतर झालेल्या हिंसेची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री ममता यांना फोन केला. या दरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप अध्यक्ष अमित शाह गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी म्हटलं होतं की, 'दीदीला भीती होती की, आमची यात्रा निघाली तर त्यांच्या सरकारची अंतिम यात्रा निघेल. रॅलीमध्ये बोलताना अमित शाहा यांनी म्हटलं की, 'ही निवडणूक पक्षामधली निवडणूक आहे. बंगालच्या संस्कृतीला संपवणाऱ्या टीएमसीला पराभूत करण्यासाठी ही निवडणूक आहे. पश्चिम बंगालच्या नागरिकांना आता निर्णय घ्यायचा आहे की, संस्कृती वाचवण्यासाठी भाजपला आणायचं की संस्कृती संपवणाऱ्या टीएमसीला. सुभाष चंद्र यांना काँग्रेस विसरली. पण पंतप्रधान मोदी सुभाष बाबू यांचं जीवन, देशभक्ती आणि बंगालमध्ये त्यांना अमर करण्यासाठी अंदमान बेटाला सुभाषजींचं नाव देण्याचा विचार करत आहे.'


शाह यांनी म्हटलं की, बंगालमध्ये टीएमसीने लोकशाही संपवली आहे. आम्ही बंगालमध्ये रथ यात्रा काढणार होतो पण आम्हाला परवानगी नाकारण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली. पण ही चूक लोकसभा निवडणुकीत करु नका. अन्यथा विटेचं उत्तर विटेने मिळेल. ही निवडणूक बंगाल सरकारच्या अंतर्गत नाही होणार आहे. निवडणूक आयोग येथे निवडणुका घेणार आहे आणि येथे पॅरामिलिट्री तैनात असेल.'